ऑनलाईन महासभेत बोलू दिले जात नाही, ऑफलाईन सभा घेण्याची सत्ताधारी भाजपातीलच नगरसेवकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:16 PM2021-01-27T18:16:15+5:302021-01-27T18:17:06+5:30
Mira Bhayander News : मीरा भाईंदर भाजपाची सूत्रे माजी आमदार नरेंद्र मेहता व समर्थकांच्या हाती एकवटल्याच्या विरोधात भाजपातील अनेक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत नगरसेवकांना बोलू दिले जात नाही , शहर व नागरिकांच्या हिताचे विषय मांडता येत नाहीत तसेच ठराव व मतदान बाबत भूमिका मांडता येत नसल्याने नगरसेवकांच्या नैसर्गिक अधिकारावर ऑनलाईन महासभे मुळे गदा येत असल्याने या पुढे ऑफलाईन महासभा घेण्यात यावी अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या १४ नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून केली आहे .
मीरा भाईंदर भाजपाची सूत्रे माजी आमदार नरेंद्र मेहता व समर्थकांच्या हाती एकवटल्याच्या विरोधात भाजपातील अनेक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे . या आधी देखील सदर नगरसेवकांनी मेहतां विरोधात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ना भेटून निवेदन दिले आहे . या शिवाय विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रीकांत भारतीय आदींना सुद्धा ह्या नगरसेवकांनी भेटून मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमे मुळे भाजपाची बदनामी व नुकसान होत असल्याचे मुद्दे मांडल्याचे चर्चेला आले होते .
त्यातच मेहता समर्थकांना पालिकेत महत्वाची पदं व समित्या दिल्या जात असल्याने मेहता विरोधातील नगरसेवक आक्रमक झाले होते . महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत सुद्धा मेहता समर्थक मोजक्या नगरसेवकांना बोलू दिले जात असल्याची अस्वस्थता भाजपात चर्चेत होती .
बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील , मदनसिंह , चंद्रकांत वैती , रवी व्यास , विनोद म्हात्रे , डॉ . सुशील अग्रवाल , सुरेश खंडेलवाल , दौलत गजरे , गणेश भोईर , पंकज पांडेय , नीला सोन्स , जयेश भोईर , वैशाली रकवी , विजय राय आदी नगरसेवकांनी आयुक्त डॉ . विजय राठोड यांची भेट घेतली .
सदर भेटीत शहरातील विविध समस्या , नागरिकांना सोयी सुविधा देणे तसेच नगरसेवकांच्या प्रभागातील कामे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली . तर ऑनलाईन महासभा बंद करून ऑफलाईन महासभा घ्या असे निवेदन आयुक्तांना देण्यात आले .
ऑनलाईन महासभेत नगरसेवकांना बोलायला मिळत नाही . त्यांना ठराव काय झाला ? व मतदान झाले का ? याची माहिती नसतानातसेच प्रत्येक नगरसेवकास न विचारताच मतदान नोंदवले जातेय . जे कायदेशीर दृष्ट्या बेकायदेशीर आहे . ऑनलाईन मुळे शहरातील व प्रभागातील समस्या , विकासकामे तसेच विषयांवर नगरसेवकांना बोलताच येत नाही . कारण माईक म्यूट करून ठेवलेला असतो . नगरसेवकांना बोलायलाच दिले जात नसेल तर महासभेचा उपयोग काय ? असे सवाल नगरसेवकांनी केले आहेत. ऑनलाईन महासभा बंद करून ऑफलाईन सभा घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे ,
वास्तविक मेहता यांचे निकटवर्तीय असलेले हसमुख गेहलोत यांना उपमहापौर पदासह गटनेते पद तसेच सातत्याने स्थायी समितीचे सदस्य पद देऊन कमालीची मेहेरनजर दाखवण्यात आली आहे . मेहता समर्थक प्रशांत दळवी यांना सभागृहनेते पद तर मेहता समर्थक अशोक तिवारीना स्थायी समिती सभापती पद दिले गेले . या शिवाय परिवहन , महिला बालकल्याण व अन्य समित्यांवर देखील मेहता समर्थकांचीच वर्णी लागल्याने भाजपात नाराजी आहे . महासभेत देखील मेहता समर्थक मोजक्याच नगरसेवकांना बोलायची संधी दिली जाते . नगरसेवकांचे मतदान देखील गटनेते गेहलोतच निश्चित करतात . त्यातूनच भाजपातील अंतर्गत असंतोष पुन्हा ह्या निमित्ताने आणखी एकदा चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे .
तर सदर भेटीत नगरसेवकांच्या प्रभागातील विविध विकासकामे व समस्या तसेच शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यां बाबत चर्चा करण्यात आल्याचे नगरसेवक ऍड . रवी व्यास म्हणाले . ऑनलाईन महासभा बंद करून ऑफलाईन घेण्याची मागणी महापौर ज्योत्सना हसनाळे व आयुक्तांना केल्याचे व्यास यांनी सांगितले .