कोरोनामुळे गरब्याचे ऑनलाइन धडे; वर्क फ्रॉम होममुळे महिलांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:22 PM2020-10-10T23:22:59+5:302020-10-10T23:23:23+5:30
संडे अँकर । ‘टिमली’ गरबा प्रकाराचे प्रशिक्षण
ठाणे : यंदा नवरात्रोत्सवात कोरोनामुळे गरबा होणार नसल्याने दरवर्षी गरबा खेळणारे यंदा आॅनलाइन गरबा शिकत आहेत. विशेषत: यात महिलांचा अधिक सहभाग असून वर्क फ्रॉम होममुळे त्यांना गरबा शिकण्याची नवीन संधी मिळाली असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. यंदा गुजरातच्या मातीतला टिमली हा गरबा प्रकार नव्याने शिकवला जात आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गरबा रंगणार नसल्याने गरबाप्रेमी आॅनलाइन गरबा शिकत आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळत नवरात्रोत्सव साजरा करण्याचे महापालिकेने सर्व सार्वजनिक मंडळांना आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा या उत्सवानिमित्ताने दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या गरब्याला ब्रेक लागणार आहे.
गरबा प्रशिक्षक वैशाली सत्रा या गरबाप्रेमींना गरब्याचे विविध प्रकार शिकवत आहेत. केवळ ठाण्यातील नव्हे तर मुंबई, पुणे, गोवा, राजस्थान, औरंगाबाद येथील गरबाप्रेमीही आॅनलाइन गरब्याचे धडे गिरवत आहेत. कोरोनाकाळातही गरब्याची आवड जोपासली जात आहे. त्यामुळे गरब्याला परवानगी नसल्याने हे गरबाप्रेमी बाहेर गरबा खेळायला जाणार नसले, तरी घरातल्या घरात कुटुंबासोबत खेळणार असल्याने ते शिकत असल्याचे सत्रा यांनी सांगितले. आॅनलाइन गरब्यामध्ये २५ ते ५५ वयोगटांतील महिला सहभागी झाल्या आहेत.
दोडियो, पोपट, पॉवर गरब्याच्याही स्टेप्स
दरवर्षी गरब्यात नवीन गरबा प्रकार किंवा एखाद्या फिल्मी गाण्यावर गरबा शिकविला जातो. यंदा नवरात्रौत्सवात मैदानात गरबा खेळला जाणार नसला, तरी घरातल्या घरात गरबा खेळणाऱ्यांना ‘टिमली’ हा गुजरातचा मूळ गरबा शिकविला जात आहे. यात हातांच्या हालचाली कमी असून पायांच्या हालचाली जास्त आहेत. त्यामुळे एक प्रकारे व्यायामही होत असल्याचे सत्रा यांनी सांगितले. दोडियो, पोपट, तीनताली, दोताली, हिच हुडो याप्रमाणे पॉवर गरबाही शिकविला जात आहे.