टपाल कार्यालय पोहोचविणार आॅनलाईन शॉपिंगच्या वस्तू घरपोच
By Admin | Published: April 11, 2017 02:50 AM2017-04-11T02:50:18+5:302017-04-11T02:50:18+5:30
आॅनलाईन शॉपिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन टपाल कार्यालयानेदेखील आता यामध्ये उडी घेतली आहे. अशा आॅनलाईनच्या पार्सलच्या वितरणासाठी मुंबईनंतर
ठाणे : आॅनलाईन शॉपिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन टपाल कार्यालयानेदेखील आता यामध्ये उडी घेतली आहे. अशा आॅनलाईनच्या पार्सलच्या वितरणासाठी मुंबईनंतर आता ठाणे टपाल कार्यालयानेदेखील पुढाकार घेतला असून ही सेवा सोमवारपासून ठाण्याच्या मुख्य टपाल कार्यालयात सुरु झाली आहे. यासाठी ठाणे टपाल कार्यालय इ कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांशी संलग्न झाले असून यासाठी दोन विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाणे कार्यालयात येणाऱ्या स्पीड पोस्टचे प्रमाण जास्त आहेच, मात्र, आॅनलाईनने येणाऱ्या पार्सलचे प्रमाणदेखील जास्त असल्याने भविष्यात ही सेवा अधिक व्यापक स्वरुपात करणार असल्याची माहिती वरिष्ठ डाकपाल वाय. एन. मोहम्मद यांनी दिली. या सेवांमुळे पोस्टमनचा भार काम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..
धकाधकीच्या आयुष्यात प्रत्यक्ष खरेदीसाठी कोणालाही वेळ नसल्याने आॅनलाईन शॉपिंगचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इ कॉमर्स उद्योगाला चांगलीच उभारी मिळाली आहे. आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यात येणाऱ्या पार्सलच्या वितरणासाठी यापूर्वीच भारतीय टपाल खात्याने पुढाकार घेतला असून मुंबईमध्ये ३५ वाहनांच्या माध्यमातून १३ वितरण केंद्रे केवळ अशा प्रकारच्या इ कॉमर्सच्या वितरणासाठी सुरु करण्यात आली आहे.
मुंबई नंतर आता ठाणे मुख्य टपाल कार्यालयामध्ये ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई आणि भांडुप या ठिकाणी ही सेवा सुरु केली आहे. ठाणे मुख्य टपाल कार्यालयाअंतर्गत संपूर्ण ठाणे शहर तसेच कळवा मुंब्रा आणि मुंब्य्राच्या आसपासची छोटी खेडीदेखील येतात. या कार्यालयात इ कॉमर्सच्या मध्यमाध्यमातून दररोज पार्सल येण्याचे प्रमाण हे १०० ते १२५ पर्यंत आहे. भविष्यात हे प्रमाण वाढणार असल्याने ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाणे टपाल कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या वितरणासाठी सध्या दोन गाड्यांची सुविधा असून यासाठी ४ पोस्टमनची नियुक्ती केली आहे. पार्सल आल्यापासून केवळ सहा तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पार्सल पोहचणार असल्याचा दावा टपाल कार्यालयाने केला आहे. यासाठी पोस्टाने अशा आॅनलाइन कंपन्यांशी टायअपही केल्याचे कार्यालयाने सांगितले. (प्रतिनिधी)
आॅनलाइन कंपन्यांशी केले टायअप
आॅनलाईन शॉपिंगचा ट्रेंड काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इ कॉमर्स उद्योगाला चांगलीच उभारी मिळाली आहे. आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यात येणाऱ्या पार्सलच्या वितरणासाठी यापूर्वीच भारतीय टपाल खात्याने पुढाकार घेतला असून मुंबईमध्ये ३५ वाहनांच्या माध्यमातून १३ वितरण केंद्रे केवळ अशा प्रकारच्या इ कॉमर्सच्या वितरणासाठी सुरु करण्यात आली आहे.
इ कॉमर्समध्ये आघाडीवर असणाऱ्या अॅमेझॉन , मिंत्रा , स्नॅपडील, अशा कंपन्याशी टायअप केले असून मुंब्य्रामधील छोट्याछोट्या भागांमध्ये ही सेवा जाणार असल्याचे टपाल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.