गणेशोत्सवासाठी आॅनलाइन परवानगी, शांतता समिती सदस्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:51 AM2017-08-12T05:51:12+5:302017-08-12T05:51:12+5:30
गणेशभक्तांच्या सोयीसाठी या वेळी पोलीस आयुक्तालयाने आॅनलाइन अर्जाची तरतूद केली आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी शांतता समिती सदस्यांच्या संवाद बैठकीत ही माहिती दिली.
ठाणे : गणेशभक्तांच्या सोयीसाठी या वेळी पोलीस आयुक्तालयाने आॅनलाइन अर्जाची तरतूद केली आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी शांतता समिती सदस्यांच्या संवाद बैठकीत ही माहिती दिली. सर्व नियमांचे पालन करून डीजेरहित उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी या वेळी केले.
गणेशोत्सव आणि दहीहंडीनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समितीच्या सदस्यांसाठी संवाद बैठकीचे आयोजन शुक्रवारी टीपटॉप प्लाझा येथे केले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा, कल्याण, भिवंडी आदी शहरांमधील खराब रस्ते आणि वाहतुकीचे प्रश्न सदस्यांनी प्रकर्षाने मांडले. सदस्यांच्या सर्व सूचनांची नोंद पोलीस अधिकाºयांनी या वेळी घेतली. गणेश उत्सवादरम्यान मंडप उभारण्याबाबत काही नियम आहेत. त्याची माहिती देऊन या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. दहीहंडीसंदर्भातही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांच्या प्रती शांतता समिती सदस्यांना दिल्या जाणार असून त्याचे पालन मंडळांकडून होत असल्याची खात्री करण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी केले. दहीहंडी हा साहसी खेळ आहे. त्यामुळे साहसी खेळासाठी असलेले नियम या उत्सवालाही लागू होत असल्याचे सहपोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
डीजेचा वापर न करणाºया मंडळांसाठी उल्हासनगर महापालिकेने २ हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. उत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्नही केले जातात. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करून ते पोलिसांच्या लक्षात आणून देण्याचे आवाहन या वेळी अधिकाºयांनी केले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागरूकता निर्माण करणाºया काही चित्रफितींचे प्रसारण या वेळी वरिष्ठ अधिकाºयांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रफिती सोशल मीडियाच्या आधारे मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्या जाणार असून चित्रपटगृहांमध्येही दाखवल्या जाणार आहेत.