ऑनलाइन ब्रह्मांड कट्टयावर घडला हरवलेला संवाद, युगल गीते आणि अभिवाचन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 03:20 PM2020-05-25T15:20:33+5:302020-05-25T15:23:00+5:30
मे महिन्याचा ब्रह्मांड कट्टा ऑनलाइन पार पडला.
ठाणे : दोन महिन्याचा हरवलेला ब्रह्मांड कट्टयावरील रसिक प्रेक्षकांचा संवाद ऑनलाइन माध्यमातून घडविण्यात आला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ब्रह्मांड कट्टा पार पडला. यात युगल गीते व अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला.
कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक सूचनांचे निकष पाळून कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली. ब्रह्मांड कट्टयाच्या सुरुवातीला 'इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर होना' ही प्रार्थना घेण्यात आली. यानंतर प्रदीप सपकाळे व कविता सपकाळे यानी प्रेम गीते सादर केली. यात सुरुवातीला 'मदहोश दिल की धड़कन' हे हिंदी प्रेमी गीत तर शुक्रतारा मंद वारा हे अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांचे अजरामर गीत सादर करु कट्टयाची संगीतय वातावरण निर्मिती केली. यानंतर मुख्य कार्यक्रम डॉ. जॉन ग्रे यांच्या मेन आर फ्रॉम मार्स, वुमन आर फ्रॉम व्हिनस या इंग्रजी पुस्तकाचा, अडव्होकेट शुभदा विद्वांस यांनी केलेला मराठी अनुवाद ,पुस्तक 'तो आणि ती' यावर आधारीत संहिता अभिवाचन,संहिता लेखन नेहा पेडणेकर केले आहे. याचे सादरीकरण महेश जोशी व स्नेहल जोशी या दांपत्यांनी केले. सद्य स्थितीत कोरोनामुळे पूर्ण कुटुंब घरीच आहे. आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून कामे करत आहे. या अभिवाचनात देखील असेच एक कुटुंब आहे. त्यातील कुटुंब प्रमुख पुरुष व गृहिणी यांचा संवाद सादर करण्यात आला. या नेहमीच्या गोष्टी पण त्यातील प्रेमळ संवाद व नव्याने उलगडणारे नाते संबंध याचे अभिवाचन जोशी दांपत्याने खुसखुशीत व खुमासदार करुन फेसबुक वर लाईकस् व कमेंट्सची दाद मिळविली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. नव्याने सादर केलेल्या कट्टयाला असंख्य रसिकांनी लाईव्ह प्रतिसाद दिला. .
कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे सध्या आपण लॉकडाऊनच्या अडचणीत सापडलो आहोत. हा लॉकडाऊन कधी संपणार आणि आपण सर्व साधारणपणे कसं जगणार असे असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले आहेत. यामुळे ब्रह्मांड कट्टयाचे कार्यक्रम देखील थांबल्या सारखे झाले होते. मध्यल्या काळात ब्रह्मांड कट्टयाने सामाजिक कार्य हातात घेतले होते. आझादनगर, धर्माचापाडा, डोंगरीपाडा, पातलीपाडा येथील गरीब गरजूनां मास्क व सैनिटायजरचे वाटप तसेच परिसरातील सोसायट्यांमध्ये लोकांचे मनौधैर्य वाढविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, ब्रह्मांड महिला परिवार संघातर्फे वाजवी दरात पीठे, मसाले व फळाचे वाटप करण्यात आले.