ठाण्यात आढळल्या फक्त १६०० चिमण्या
By admin | Published: May 16, 2017 12:16 AM2017-05-16T00:16:51+5:302017-05-16T00:16:51+5:30
चिऊकाऊच्या गोष्टी यापूर्वीच कालबाह्य झाल्या आहेत. आता एक घास चिऊचा, एक माऊचा हेही नामशेष झाले. आता चिमण्यांचीच संख्या इतकी झपाट्याने घटली आहे की
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चिऊकाऊच्या गोष्टी यापूर्वीच कालबाह्य झाल्या आहेत. आता एक घास चिऊचा, एक माऊचा हेही नामशेष झाले. आता चिमण्यांचीच संख्या इतकी झपाट्याने घटली आहे की, ठाणे शहरातील चिमणीगणनेत केवळ १६०० चिमण्या आढळल्या. काही वर्षांनंतर चिमणी पाहण्यासाठी ठाणेकरांना राणीच्या बागेत जावे लागेल किंवा डॉक्युमेंटरीत चिमणी पाहण्यावर समाधान मानावे लागेल, असे पक्षिनिरीक्षकांचे म्हणणे आहे.
प्रथमच ‘ठाणे चिमणीगणना’ ही मोहीम राबवण्यात आली. या १० दिवसांच्या गणनेत पक्षिनिरीक्षकांना १६०० चिमण्या आढळून आल्या. हे प्रमाण कमी होण्यामागे शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे होणारे वायुप्रदूषण आणि वाढत चाललेले ध्वनिप्रदूषण ही कारणे असल्याचे ‘होप’ संस्थेतर्फे सांगण्यात आले.
होप संस्था आणि पर्यावरण दक्षता मंडळातर्फे नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी ठाणे शहरातील दोन किमी अंतरावरचे २३ रस्ते निवडण्यात आले. या गणनेत ५० पक्षिनिरीक्षक व ८० पक्षिप्रेमी सहभागी झाले होते. प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ४ ते ६ अशी दोन तासांची वेळ ठरवण्यात आली होती. चिमण्या कमी झाल्याचा आढावा घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यात आयोजकांना १६०० चिमण्या आढळून आल्या. सकाळी चिमण्या अधिक, तर संध्याकाळी चिमण्या कमी हे विशेष निरीक्षण निरीक्षकांनी नोंदवले. या गणनेत काही ठिकाणी नरांची संख्या अधिक आणि मादींची संख्या कमी, तर काही ठिकाणी मादी अधिक आणि नर कमी संख्येने आढळून आले. हे प्रमाण पाहिले तर २ : १ असे आढळले. ज्या ठिकाणी जास्त वाहतूक आणि खूप रहदारी आहे, त्या भागात एका हेक्टरमध्ये तीन चिमण्या, तर ठाणे महाविद्यालयातील परिसर, खाडीची बाजू, टिकुजिनीवाडी यासारख्या कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी एका हेक्टरमध्ये १० ते १२ चिमण्या आढळून आल्या. ज्या शहरांत चिमण्यांची संख्या अधिक असते, अशा शहरांत एका हेक्टरमध्ये १०० चिमण्या असे प्रमाण असते. त्यामुळे जास्त चिमण्यांच्या शहरांच्या तुलनेत ठाण्यात चिमण्यांची संख्या कमी झाल्याची वस्तुस्थिती असल्याचे होप संस्थेचे विश्वस्त डॉ. शशिकुमार मेनन यांनी सांगितले. जेथे वाहनांचा आवाज अधिक आहे, तिथे चिमण्यांचे वास्तव्य कमी दिसून आले, ज्या सोसायट्यांत चिमण्यांना पाणी आणि खाद्य ठेवले, तेथे त्यांची संख्या थोडी अधिक आढळली. जिथे खुले मैदान, गवत आहे, वाहतूक आहे, अशा ठिकाणीही चिमण्यांची संख्या जास्त आढळल्याचे त्यांनी सांगितले. येऊरमधील लॅम्प शेड, फ्लायओव्हर पाणी जाण्याच्या मार्गातही चिमण्यांचे घरटे आढळले. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होते, तेथे चिमण्या नाहीत. सकाळी कदाचित त्या येत असाव्यात, पण दिवसा उडतउडत दुसरीकडे स्थलांतरित होत असाव्यात, असा अंदाज त्यांनी वर्तवला.