एक कोटी लोकांसाठी अवघ्या २ हजार २७० खाटा

By संदीप प्रधान | Published: August 15, 2023 08:09 AM2023-08-15T08:09:01+5:302023-08-15T08:09:41+5:30

सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले.

only 2 thousand 270 beds for one crore people | एक कोटी लोकांसाठी अवघ्या २ हजार २७० खाटा

एक कोटी लोकांसाठी अवघ्या २ हजार २७० खाटा

googlenewsNext

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकसंख्येचा विचार केला तर एक कोटींच्या आसपास लोक येथे वास्तव्य करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शासकीय व महापालिका इस्पितळांत केवळ दोन हजार २७० खाटा उपलब्ध आहेत. 

ठाणे शहराची लोकसंख्या २८ ते ३० लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येकरिता कळव्यातील ५०० खाटांचे रुग्णालय, सध्या जमीनदोस्त झालेले व मनोरुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात सुरू असलेले ३५० खाटांचे रुग्णालय, खासगी संस्थेला चालवायला दिलेले हाजुरी येथील २५० खाटांचे रुग्णालय, मुंब्रा कौसा येथील १०० खाटांचे रुग्णालय व ३३ आरोग्य केंद्रे अशी तुटपुंजी सरकारी आरोग्य व्यवस्था आहे. ठाण्यात खासगी इस्पितळे, रुग्णालये अनेक आहेत. परंतु तेथील उपचार हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तेथेही रुग्णांची भलीमोठी वेटिंग लिस्ट असते. कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या या घडीला किमान १८ ते २० लाख आहे. या लोकसंख्येसाठी कल्याणमधील वसंत व्हॅली येथील ५० खाटांचे प्रसूतिगृह, कल्याणमधील १२० खाटांचे रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील १२० खाटांचे शास्त्री रुग्णालय एवढीच आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आयसीयू सुरू केले होते. परंतु दोन दिवसांत ते बंद केले. या दोन्ही शहरांमध्ये निवासी इमारतीत खासगी नर्सिंग होम चालवली जातात. 

कल्याण-डोंबिवलीत मोजकीच मोठी इस्पितळे आहेत. मात्र, त्यांचा दर्जा ठाण्यातील ज्युपिटर अथवा तत्सम इस्पितळांसारखा नाही. उल्हासनगराची आजमितीस लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे. येथे २०० खाटांचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, २०० खाटांचे कामगार रुग्णालय व १५० खाटांचे प्रसूतिगृह आहे. येथे कर्जत, कसाऱ्यापासून रुग्ण उपचाराकरिता येतात. सात लाख लोकसंख्येच्या भिवंडीत ०० खाटांचे स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, ५० खाटांचे अंबाडी ग्रामीण रुग्णालय आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांची या शहरांची मिळून लोकसंख्या पाच ते सात लाख आहे. अंबरनाथमधील छाया उपजिल्हा रुग्णालय ४० खाटांचे आहे तर बदलापूरचे दुबे ग्रामीण रुग्णालय ४० खाटांचे आहे.

ठाणे जिल्ह्यातील या शहरांकडून नाशिक, गुजरातकडे वाहतूक होते. अनेक मंत्री व धनदांडगे याच भागातून प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याच्या हिताकरिता तरी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील आरोग्य सुविधा सुधारणे गरजेचे आहे.

 

Web Title: only 2 thousand 270 beds for one crore people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे