रिंग रूटसाठी अवघे २० टक्केच भूसंपादन

By admin | Published: January 20, 2016 01:50 AM2016-01-20T01:50:19+5:302016-01-20T01:50:19+5:30

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रिंग रूटचे एमएमआरडीएचे नियोजन असले तरी त्यासाठी लागणारी जागा जोवर पालिका पूर्णपणे संपादन करत नाही, तोवर हा प्रकल्प अस्तित्वात येणे अशक्य आहे.

Only 20% land acquisition for ring route | रिंग रूटसाठी अवघे २० टक्केच भूसंपादन

रिंग रूटसाठी अवघे २० टक्केच भूसंपादन

Next

मुरलीधर भवार,  कल्याण
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रिंग रूटचे एमएमआरडीएचे नियोजन असले तरी त्यासाठी लागणारी जागा जोवर पालिका पूर्णपणे संपादन करत नाही, तोवर हा प्रकल्प अस्तित्वात येणे अशक्य आहे. त्यासाठी पालिकेने भूसंपादनाला सुरुवात केली असली तरी आतापर्यंत अवघी २० टक्केच जागा संपादित झाली आहे. उर्वरित भूसंपादनाला नेमका किती वेळ लागेल, याचे वेळापत्रकच पालिकेकडे नसल्याने रिंग रूटचे भवितव्य भोवऱ्यात सापडले आहे.
मोठागाव ठाकुर्लीपासून या रिंग रोडला सुरुवात होईल. हा प्रकल्प आधी पालिका क्षेत्रापुरता मर्यादित होता. २७ गावांचा समावेश झाल्याने त्याचा विस्तार करण्यात आला असून काटई, भोपर, आयरेगाव, कोपर, मोठागाव ठाकुर्ली, देवीचापाडा, चोळेगाव, उंबर्डे, सापार्डे, गांधारी, टिटवाळा, मांडा अशा शहरांच्या सर्व भागांना जोडणाऱ्या या रिंग रोडसाठी एमएमआरडीए ५७८ कोटी रुपये देणार आहे. २९ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी पालिकेने जागेचे मोजमाप पूर्ण केले आहे. ही जागा बहुतांश खाजगी असल्याने पालिकेने तिच्या संपादनाची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत २० टक्के जागा संपादित करण्यात यश आले आहे. या जागामालकांना भूसंपादनाच्या बदल्यात टीडीआर अथवा आर्थिक मोबदला द्यावा लागणार आहे. त्याची रक्कम नेमकी किती होईल, याचा हिशेब पालिकेच्या दप्तरी अद्याप नाही. विकास आराखड्यानुसार हा रस्ता काही ठिकाणी ३०, ४० आणि १०० फुटी रुंद आहे. खाजगी जागा महापालिकेने ताब्यात घेतली तरी नऊ किलोमीटरचा परिसर सीआरझेडमध्ये आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून परवानगी घ्यावी लागेल. तसा प्रस्ताव पालिका पाठविणार आहे. एकंदर प्रक्रिया पाहता रिंग रोड पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील, असा पालिका अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
रिंग रोडचाच भाग असलेल्या डोंबिवली मोठागाव-ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाच्या कामाची २२३ कोटींची निविदा मंजूर झाली आहे.

Web Title: Only 20% land acquisition for ring route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.