जिल्ह्यातील गावपाड्यात अवघे २० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:43+5:302021-05-12T04:41:43+5:30
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या ...
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या गावपातळीवरील सहा लाख १७ हजार ६३३ जणांच्या लसीकरणापैकी २० टक्के म्हणजे एक लाख ४२ हजार २०३ जणांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. यात अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शहरांचाही समावेश आहे.
जिल्ह्यातील गावपाड्यांसह नगरपालिकांच्या शहर परिसरात आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रारंभापासून सुरू आहे. शहरी भागाच्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आतार्यंत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धा व गैरसमज झालेला असल्याने त्यांच्याकडून लसीकरणाला फारसा प्रतिसाद दिला जात नाही. या गावपाड्यातील ४ लाख ५७ हजार ९३८ या एकूण लसीकरणापैकी आजपर्यंत १ लाख ३ हजार २८२ जणांचे म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांचे गावखेड्यात लसीकरण झाले आहे. या ग्रामीण भागात अजूनही ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे लसीकरण तब्बल बाकी आहे.
तर नगर परिषद क्षेत्रात १ लाख ५९ हजार ६९४ जण लसीकरणाचे लाभार्थी आहेत. यापैकी ३७ हजार ९२१ जणांचे (२० टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण व नगर परिषद क्षेत्रात एक लाख २४ हजार ९११ जणांनी पहिला डोस पूर्ण केला असून दुसरा डोस १६ हजार २९२ जणांनी आरोग्य विभागाच्या नियंत्रणात पूर्ण केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील गावपाड्यांच्या ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे व नगर परिषदेच्या १ लाख २७ हजार ९७३ जणांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. गैरसमज आणि अंधश्रद्धा आणि त्यात लसचा तुटवडा असल्याने लसीकरण कमी झाल्याचे वास्तव ग्रामीण भागात दिसून येत आहे.