भातसात २८ तर बारवीत केवळ १२ टक्के पाणीसाठा
By admin | Published: June 8, 2015 11:57 PM2015-06-08T23:57:24+5:302015-06-09T03:45:27+5:30
मुंबई व ठाणे महापालिकांना पाणीपुरवठा करणार्या भातसा धरणाच्या ९४२.१० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीसाठ्यापैकी सोमवारपर्यंत २६५.१० एमएलडी म्हणजे केवळ २८.१४ टक्के साठा शिल्लक आहे.
ठाणे : मुंबई व ठाणे महापालिकांना पाणीपुरवठा करणार्या भातसा धरणाच्या ९४२.१० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीसाठ्यापैकी सोमवारपर्यंत २६५.१० एमएलडी म्हणजे केवळ २८.१४ टक्के साठा शिल्लक आहे. याप्रमाणेच बारवी धरणातही १८०.०३ एमएलडीपैकी २१.८६ म्हणजे १२.१४ टक्केच पाणी शिल्लक आहे.
याप्रमाणेच उल्हास नदीद्वारे पाणी मिळणार्या आंध्र धरणात ३३९.१४ पैकी ६५ एमएलडी (१९.१७ टक्के), मोडक सागर धरणात १२८.९३ पैकी ५०.४५ एमएलडी (३९.१३ टक्के) आणि तानसातील १४५.०८ एमएलडी पाणीसाठ्यापैकी सध्या १३.७३ एमएलडी (९.४६ टक्के) पाणी शिल्लक आहे.
या धरणांपैकी मागील सहा दिवसांपासून सर्वाधिक मोडक सागरमध्ये २८.८० मिमी पाऊस पडला आहे. या खालोखाल भातसात २४ मिमी, आंध्रात १८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
बारवी व आंध्र धरणांमध्ये सध्या पाणीसाठा कमी असला तरी तो १५ जुलैपर्यंत पुरणार आहेच. याशिवाय, आंध्रचे पाणी उल्हास नदीद्वारे मिळणार असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता नसल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले.