अंबरनाथमधील कोविड रुग्णालयात केवळ ३४ बेड शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:56+5:302021-03-31T04:40:56+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ ...
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे अवघे ३४ बेड शिल्लक राहिले असून, येत्या दोन दिवसांत तेही भरले जाणार आहेत. त्यामुळे वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने जांभूळ गाव येथील डेंटल महाविद्यालयात ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. एका दिवसात तेही भरणार असल्याने शहरातील वाढत्या रुग्णाला संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यायी रुग्णालयाची गरज भासत आहे. कोविड रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्याने आता कोविडमुळे गंभीर झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी उपचार केले जात आहेत, तर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना अवघ्या तीन ते चार दिवसांतच घरी सोडण्यात येत आहे.
अंबरनाथमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही अंबरनाथ शहर आणखी २०० ते २५० शे बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डेंटल महाविद्यालय याव्यतिरिक्त आता अंबरनाथ पालिकेने उभारलेल्या यूपीएससी सेंटरमध्येही २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने काम करण्याची सूचना खासदार शिंदे यांनी दिले. या ठिकाणी ३० बेडचे आय सीयू सेंटरही उभारले जाणार आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेने ५०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी या ठिकाणी आयसीयू कक्ष आणि व्हेंटिलेटरची कोणतीही सुविधा नाही, त्यामुळे अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे.