मराठी भाषा उपक्रमांवर फक्त पाच कोटी खर्च - नरेंद्र लांजेवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:06 AM2018-04-02T07:06:22+5:302018-04-02T07:06:22+5:30
महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले जातात.
ठाणे - महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले जातात. ते पाहता राज्यात भाषा संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकावर एक रुपयाही खर्च होत नाही, इतकी वाईट स्थिती आहे, असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक नरेंद्र लांजेवार यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.
शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात दुसरे सत्र ‘वाचन संस्कृतीत रूजवण्याच्या विविध वाटा’ या विषयावर पार पडले. त्यावेळी लांजेवार बोलत होते. इंटरनेट-फेसबुक आपल्या हाती आल्यापासून आपण वाचनापासून दूर चाललो आहोत. हल्लीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख असा उल्लेख नसतो. संपादकीय असा शब्द वापरला जातो. मात्र आजच्या मुलांना हे समजत नाही. वर्तमानपत्रांमध्ये छापून येणाऱ्या एखाद्या लेखाबद्दल, नवीन मासिक सुरू झाले किंवा बंद झाले की त्याबद्दलही आपण चर्चा करत नाही. ही चर्चा आपण घडवली पाहिजे. यातून आपले भाषेशी निगडित प्रश्न ऐरणीवर येतील, यासाठी तरी बोलले पाहिजे. यातूनच वाचनसंस्कृती रुजेल आणि वाचक वाढतील. रसिकमन हे खºया अर्थाने ग्रंथालयांनी घडवले पाहिजे, असे लांजेवार या वेळी म्हणाले.
प्रकाश देशपांडे म्हणाले, हल्ली शिक्षकांना मुलाखतीदरम्यान काय वाचायला आवडते, असं विचारलं असता गुरुचरित्र, पोथी वाचतो अशी उत्तरे मिळतात. चांगली पुस्तके, पेपर ते वाचत नाहीत. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढणार कशी, वाचणारा शिक्षक दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी स्पर्धा घेण्याची वेळ आली
आहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
आईवडिलांनी मुलांना पुस्तक, गोष्टी वाचायला न लावता त्या सांगायला सुरुवात करायला हवी. वाचनसंस्कृती वाढवणे आणि रुजवण्याच्या विविध वाटा उपलब्ध असून आपण त्या अंगीकारल्या पाहिजे, असे लेखक रवींद्र खटावकर यांनी सांगितले. राजेंद्र वैती यांनी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथयानाची माहिती दिली.
अनुदानवाढीबाबत अवाक्षर नाही
सध्या वाचनाबद्दल अतिशय निराशाजनक स्थिती आहे. आजही मंत्री तावडे येथे आले, मात्र ग्रंथालयांच्या अनुदानवाढीबाबत ते एक शब्दही बोलले नाहीत. या मुद्द्याला त्यांनी हात घातलाच नाही, अशा शब्दांत प्रकाश देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली.