सरपंच निवडीनंतरच ठरणार ग्रामपंचायतींचे खरे ‘सत्ता’धारी, आघाडी, भाजपचे दावे सारखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:08 AM2021-01-19T09:08:00+5:302021-01-19T09:08:34+5:30
आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. शहापूर तालुक्यातील चेरपाेली ग्रामपंचायतीतून सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ठाणे - जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल साेमवारी जाहीर झाले. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ग्रामपंचायतींत बाजी काेण मारणार याची उत्सुकता लागली हाेती. दाेन्ही पक्षांनी या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली हाेती. त्यामुळे ग्रामपंचायतींचे निकाल लागताच या पक्षांनी आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र, सरपंच पदाच्या निवडणुकीनंतरच आता सत्ताधारी काेण याचा फैसला हाेणार आहे.
आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. शहापूर तालुक्यातील चेरपाेली ग्रामपंचायतीतून सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात भाजपचे तर बदलापूर ग्रामीण भागात शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. मुरबाड तालुक्यात महाविकास आघाडीने ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे तर भाजपने ३७ ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचे सांगितले. तालुक्यातील तब्बल २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे, तर १४ ठिकाणी भाजपने सत्ता बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने तीन ठिकाणी तर श्रमजीवी संघटनेला दाेन ठिकाणी यश मिळाले आहे. तर भाजपच्या खासदारांनी ३० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे.
मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने ३८ जागांवर दावा केला असून, भाजपने ३७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचे सांगितले. तालुक्यात १२६ पैकी ४४ ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या होत्या. दोन्ही बाजूंकडून सारखाच दावा केल्याने खरे वास्तव सरपंच निवडीनंतर स्पष्ट होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की, भाऊबंदकीत वादविवाद होतात. त्यासाठी भाजपचे आमदार किसन कथोरे, तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव तर शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, विधानसभा संघटक मधुकर घुडे, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे या नेत्यांनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हट्टी कार्यकर्त्यांनी नेत्यांचा आदेश न मानता निवडणुका लढवल्या. खरे तर निवडणूकपूर्व बिनविरोध करण्याचे नाटक करायचे आणि निवडून आल्यानंतर आपल्याच पक्षाचा दावा करायचा. तसे या निवडणुकीतही बघण्यास मिळाले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी ३७ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला, तर शिवसेनेकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीने ३१ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवल्याचे सांगितले. मात्र, सरंपच निवडणुकीनंतर कोणाकडे किती ग्रामपंचायत हे स्पष्ट होणार आहे.