सर्वेक्षणानंतरच मालमत्ता होणार सील

By admin | Published: May 24, 2017 01:02 AM2017-05-24T01:02:10+5:302017-05-24T01:02:10+5:30

सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. सागर इन्व्हेस्टमेंटच्या प्रमुखांच्या नावे जी काही संपत्ती आहे त्याचे सर्वेक्षण करून माहिती घेतली जात आहे

Only after the survey will the property be sealed | सर्वेक्षणानंतरच मालमत्ता होणार सील

सर्वेक्षणानंतरच मालमत्ता होणार सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. सागर इन्व्हेस्टमेंटच्या प्रमुखांच्या नावे जी काही संपत्ती आहे त्याचे सर्वेक्षण करून माहिती घेतली जात आहे. ही माहिती गोळा झाल्यावरच त्या मालमत्ता सील केल्या जातील असे तपास
अधिकारी सुलभा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. तसेच सागर इन्व्हेस्टमेंच्या नावाने आणि त्यांच्या संचालकांच्या नावे असलेले सर्व बँक खात्यांमधील व्यवहार थांबविण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सागर इन्व्हेस्टमेंटच्या गैरव्यवहार प्रकरणात ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असून या प्रकरणात सागरचे प्रमुख सुहास समुद्र आणि सुनीता समुद्र यांनी शरणागती पत्करली असली तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. या प्रकरणात ठोस पुरावे जमवण्यावरच भर देण्यात आला आहे. समुद्र यांच्याकडून सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीची आणि केलेल्या गुंतवणूकीची माहितीही घेतली जात आहे.
जागा, व्यापारी गाळे, दुकाने, फ्लॅट आणि प्लॉट यांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोबत ज्या- ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्यांची माहिती मिळवण्यात येत आहे. सागर इन्व्हेस्टमेंटचे आर्थिक व्यवहार ज्या सी.ए. मार्फत केले जात होते त्याच्याकडूनही माहिती मिळवण्याचे काम केले जात आहे. समुद्र कुटुंबातील सदस्य परदेशात गेले आहेत की नाही याचीही माहिती पोलीसांमार्फत घेतली जात आहे.
गुंतवणूकदारांचा सर्वाधिक रोष हा सुहास समुद्र यांचा मुलगा श्रीराम याच्यावर आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीराम हा पोलिसांना सापडलेला नाही. तो परदेशात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र श्रीराम हा महाराष्ट्राचत लपल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच तो परदेशात पळून जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. समुद्र कुटुंबियांच्या नावे असलेले सर्व बँक खाती आणि सागर इन्व्हेस्टमेंटचे सर्व बँक खात्यातील व्यवहार थांबविण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गुंतवणूकदार हवालदिल झाले असून त्यांनी अनेक नेत्यांना साकडे घातले आहे.

Web Title: Only after the survey will the property be sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.