चक्क नगरसेवकानेच मागितले कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:53 AM2018-10-29T00:53:14+5:302018-10-29T00:54:37+5:30
आयुक्तांना दिले पत्र, १३ लाखांत भंगार साहित्य घेण्याची तयारी
मीरा रोड : महापालिकेच्या पथकाने कारवाईदरम्यान गोळा केलेले भंगार मिळवण्यासाठी प्रभाग समिती सभापतीनेच १३ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवल्याने नगरसेवकच थेट कंत्राट घेण्यास सरसावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या प्रभाग समित्या असून प्रत्येक प्रभाग समितीनुसार फेरीवाला पथक नेमलेले आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्या हातगाड्या, बाकडे, लोखंडी स्टॅण्ड आदी साहित्य पालिका जप्त करते. जप्त केलेल्या साहित्याचा ई-लिलाव करण्यासाठी ३ सप्टेंबरला सूचना प्रसिद्ध केली होती. २४ सप्टेंबरला पालिकेने घेतलेल्या ई-लिलाव प्रक्रियेत दोघांनी बोली लावल्या होत्या. यात सर्वात जास्त साडेअकरा लाख रुपयांची बोली लावणाऱ्या कंत्राटदारास पालिकेने भंगार देण्यास मंजुरीची प्रक्रिया सुरू केली.
ही बाब भाजपाचे नगरसेवक तथा प्रभाग-४ चे सभापती अरविंद शेट्टी यांना कळताच त्यांनी आयुक्त व उपायुक्तांनाच पत्र देऊन या भंगार साहित्यासाठी आपण १३ लाखांची बोली लावत असल्याचे कळवले. त्यामुळे अन्य निविदाधारकांपेक्षा आपली रक्कम जास्त असल्याने आपल्या निविदेचा विचार करावा, जेणेकरून महापालिकेसही फायदा होईल, असे शेट्टी यांनी पत्रात कळवले.
आश्चर्य म्हणजे, शेट्टी यांच्या पत्रावर अतिक्रमण विभागाचे प्रमुख दादासाहेब खेत्रे यांनी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने पत्र निकाली काढण्यात येत आहे, असे कळवले. काही लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची पालिकेच्या कंत्राटामध्ये टक्केवारी तसेच काहीत भागीदारी असल्याची चर्चा होत असते. पण, शेट्टी यांनी थेट पत्र देऊनच कंत्राटासाठी बोली लावल्याने या टक्केवारीच्या आरोपांना बळ मिळाले आहे.
पालिकेचा फायदा असल्याचा दावा
स्वत: शेट्टी यांनी मात्र महापालिकेचा फायदा करून द्यावा, म्हणून आपण १३ लाखांमध्ये कंत्राट घेण्यास तयार असल्याचे पत्र दिले, असे सांगितले. नगरसेवकाने थेट लेखी पत्र देऊन कंत्राट मागण्याचा प्रकार लाजिरवाणा आहे. हा भ्रष्टाचारच म्हटला पाहिजे. एकतर, कंत्राट मिळवण्यासाठी वा ज्या कंत्राटदाराला कंत्राट मिळणार आहे, त्यात आडेबाजी करण्यासाठीचा हा प्रकार असण्याची शक्यता माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.