ठाण्यात स्मार्ट सिटीची केवळ पायाभरणी, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:48 AM2017-10-28T03:48:26+5:302017-10-28T03:48:29+5:30
ठाणे : जिल्ह्यातील स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत ठाण्यासह कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई या तीन महानगरांचा समावेश होता; परंतु नवी मुंबईचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत ठाण्यासह कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई या तीन महानगरांचा समावेश होता; परंतु नवी मुंबईचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. यामुळे ठाणे व केडीएमसी स्मार्ट सिटीसाठी सर्व शक्ती पणाला लावून विविध प्रकल्पही घोषित केले; परंतु या दोन्ही महानगरांकडून सुमारे सहा हजार ८४८ कोटी कोटींच्या स्मार्ट सिटीची केवळ पायाभरणीच सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत आढळून आले आहे.
महासभेने प्रस्तावित प्रकल्पांचा प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे नवी मुंबई सध्या तरी स्मार्ट सिटीतून बाहेर पडल्याचे उघड होत आहे. ‘जिल्ह्यातील स्मार्ट सिटीला कासवगती’ या मथळ्याखाली लोकमतमध्ये वर्षाप्रारंभी वृत्त प्रसिद्ध केले असता, त्याची दखल घेऊन दिशा समितीच्या बैठकीमध्ये या स्मार्ट सिटीच्या कामाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत ठाणे व केडीएमसीला केंद्र शासनाकडून अल्पसा निधी मंजूर झाला आहे. नवी मुंबई या स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडल्याचे निदर्शनात आले. नवी मुंबईच्या या विकास आराखड्यांच्या पूर्वतयारीसाठी सुमारे १०० कोटींचा निधी आणि संचालकांचे नामनिर्देशन असलेला हा प्रस्ताव महासभेने नामंजूर करून स्मार्ट सिटीतून बाहेर राहण्याचे पसंत केल्याचे उघड झाले.
केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटीसाठी सुमारे पाच हजार ४०४ कोटी खर्चून ठाणे शहर स्मार्ट होणार आहे. क्षेत्राधारित, पुनर्विकास आणि पॅन सिटी सोल्युशन्स या स्वरूपांच्या प्रकल्पांद्वारे ठाणे शहर स्मार्ट सिटी म्हणून आकाराला येणार आहे. या प्रकल्पाचे आराखडेदेखील तयार झाले. त्यासाठी सुमारे एक कोटी केंद्राकडून प्राप्त झाले आहेत. यातून तयार केलेल्या तीन विकास आराखड्यांना आकार देण्यासाठी ‘ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड’ या कंपनीची घोषणा झाली आहे. त्याद्वारे उभ्या राहणा-या या स्मार्ट सिटीत ठाणे रेल्वे स्टेशनचा पूर्व-पश्चिम परिसर, नौपाडा, पाचपाखाडी, खारकर आळी आणि उथळसर परिसराचा क्षेत्राधारित विकास होणार आहे.
यामध्ये ठाणे स्टेशनच्या पूर्वेला सॅटीस, वॉटरफ्रंट कळवा ब्रिजपर्यंत, तर मनोरुग्णालयाजवळ नवीन रेल्वेस्टेशन होणार असून पायाभूत सुविधा आणि सौरऊर्जा छत आदींचा या क्षेत्राधारित विकासामध्ये समावेश आहे. पुनर्विकासामध्ये वागळे इस्टेटच्या किसननगरचा समावेश आहे. पॅन सिटी सोल्युशनमध्ये वायफाय, स्मार्ट मीटरिंग, डीजीकार्ड, सीसीटीव्ही बसवण्याचे प्रस्तावित आहेत; पण या कामास अद्यापही फारशी गती नसल्याचे आढळून आले आहे.
>२ कोटींपैकी केवळ ७७ लाखांचाच खर्च
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) स्मार्ट सिटीत १७ प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्यावर, एक हजार ४४४ कोटी ४५ लाख रुपये खर्च होणार आहेत. यामध्ये सहा प्रकल्प एरिया बेस्ड, विकासात्मक १० प्रकल्प आणि एक ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट (टाउनशिप) आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ‘कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी केडीएमसीची स्मार्ट सिटी उदयाला आणणार आहे. या प्रकल्पांच्या पायाभूत कामासाठी प्राप्त झालेल्या दोन कोटींपैकी केवळ ७७ लाख रुपये खर्च झाल्याचे निदर्शनात आले आहे.