हलगर्जीपणामुळे अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:45 AM2019-02-07T02:45:38+5:302019-02-07T02:45:51+5:30
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा एनआयसीयूची सोय नसल्याने मृत्यू झाला आहे.
मीरा रोड - पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा एनआयसीयूची सोय नसल्याने मृत्यू झाला आहे.
३० जानेवारीला सायंकाळी अनिता प्रसाद हिला प्रसूतीसाठी रुग्णालया दाखल केले. प्रसूतीनंतर नवजात बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र, रुग्णालयात अत्यावश्यक अशी एनआयसीयूची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.
पालकांनी कस्तुरी या खाजगी रुग्णालयात बाळाला दाखल केले. तेथील डॉक्टरांनी बाळास १५ ते २० दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल, असे सांगत त्याचा खर्चही सांगितला. हा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या कुंदन यांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात १ फेब्रुवारीला बाळास नेले. परंतु, जागा नसल्याचे सांगून बाळास दाखल करण्यास नकार दिला. कुंदन यांच्या परिचिताने याबाबत आ. प्रताप सरनाईक यांना सांगितल्यावर त्यांनी याबाबत पत्र दिले. त्यानंतर, बाळ दाखल तर झाले. परंतु, या वेळकाढू आणि दगदगीच्या प्रक्रियेत २ फेबु्रवारीला बाळाचा मृत्यू झाला.
रुग्णालयात लहान मुलांसाठी एनआयसीयू युनिट तसेच आयसीयू नाही. डॉक्टरांना आवश्यकता वाटल्यास रुग्णास ठाणे जिल्हा रुग्णालय वा शताब्दी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो.
- डॉ. आनंद पांचाळ,
वैद्यकीय अधिकारी
महापालिका व सत्ताधारी भाजपाला गोरगरिबांचे अजिबात सोयरसुतक नाही. त्यांना केवळ स्वत:चा फायदा करून घेण्यातच स्वारस्य आहे. त्यासाठीच सत्ता राबवली जात आहे. रुग्णालयात होणाºया मृत्यूंना पालिका जबाबदार आहे. एनआयसीयू आणि आयसीयू सुरू करायला पालिकेकडे पैसे नाही. पण, नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायला पैसे आहेत.
- नीलम ढवण, नगरसेविका