केवळ आगपाखड करून निवडणूक जिंकणे अशक्य’
By admin | Published: June 27, 2017 03:06 AM2017-06-27T03:06:22+5:302017-06-27T03:06:22+5:30
नोटबंदीचे परिणाम असो, येऊ घातलेला जीएसटी कर तसेच नुकतीच झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्यांवर पुढील काळात सरकारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नोटबंदीचे परिणाम असो, येऊ घातलेला जीएसटी कर तसेच नुकतीच झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्यांवर पुढील काळात सरकारवर केवळ आगपाखड करून निवडणूक जिंकता येणार नाहीत, त्यासाठी आतापासूनच जनेतच्या संपर्कात राहून कामे केली पाहिजेत, असा सल्ला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात दिला.
पश्चिमेतील सनई मंगल कार्यालयात रविवारी कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा झाला. या वेळी नाईक बोलत होते. ते म्हणाले, सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. एकीकडे बहुमत असल्याचा दावा एनडीए करीत असलीतरी त्यांचा उमेदवार जिंकेल, याबाबत संभ्रम आहे. इंदिरा गांधीच्या सत्ताकाळात त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली होती, तर विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता, याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले.
नाईक यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या, सरकारची उणीदुणी काढून निवडणूक जिंकता येणार नाही, त्यासाठी विचारसरणी आणि कार्याची बैठक हवी. शिवसेना ही शाखांच्या माध्यमातून मोठी झाली. राष्ट्रवादीची प्रत्येक प्रभागात जनसंपर्क कार्यालये सुरू झाली पाहिजेत, मात्र ती शेठजीच्या पैशातून नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांचा बळावर उघडायला हवीत, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले. पक्षाचे काम करताना संघटन आणि चळवळ महत्त्वाची असून नवी मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी अॅडमिशनपासून ते अॅम्ब्युलन्स सेवेपर्यंतची जनतेची सर्व कामे केली पाहिजेत, असा मोलाचा सल्लाही नाईक यांनी या वेळी दिला. निवडणूक लढवण्यासाठी लागणारा आणि सातत्याने वाढत जाणारा खर्च पाहता गोरगरीब कार्यकर्त्यांनी कशा लढवायच्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.