मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 05:37 AM2024-10-06T05:37:51+5:302024-10-06T05:38:44+5:30
महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांना ‘लाडकी बहीण’ योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करत त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासालाच फक्त आपले लक्ष्य मानते. मात्र, महाविकास आघाडी सरकार हे केवळ विकासकामांना थांबवणारे आणि लोकांची दिशाभूल करणारे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. त्यामुळे विकासकामांना रोखणाऱ्या अशा शत्रूंना सत्तेबाहेरच रोखा आणि महायुतीचे प्रामाणिक सरकार निवडून द्या, असे आवाहनही मोदींनी केले. दरम्यान, पंतप्रधानांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा मराठीत केली. ही घोषणा करताना आनंद होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
येथील वालावलकर मैदानात आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ठाणेअंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, उन्नत मार्ग विस्तार छेडा नगर ते ठाणे आनंदनगरपर्यंत या विकासकामांचे भूमिपूजन, मुंबई मेट्रो मार्ग ३ टप्पा एक लोकार्पण आणि ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोदी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटा, ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिराती शिवलिंग आणि दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा भेट दिली. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदिती तटकरे, शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
मविआमुळे मेट्रोचा खर्च वाढला
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते, असे नमूद करून मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने खोडा घालीत मेट्रोचे काम अडीच वर्षे थांबवले. त्यामुळे या प्रकल्पाच्या किमतीत १४ हजार कोटींची वाढ झाली. मविआने बुलेट ट्रेन, राज्याची तहान भागवणाऱ्या योजना रोखल्या, त्यामुळे आता तुम्हाला यांना रोखायचे आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस सर्वांत बेइमान आणि भ्रष्ट पार्टी असल्याचा आरोपही मोदींनी केला. काँग्रेसचे चरित्र कधीच बदलत नाही. मोदींनी काँग्रेसशासित राज्यांमधील काही घोटाळ्यांचे दाखले दिले.
काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांसोबत
जेव्हापासून काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला. काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांसोबत आहे, असा आरोप मोदींनी केला. त्यामुळे ते आता इतरांमध्ये फूट पाडून सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर आपण विखुरलो तर ते आनंद साजरा करतील, त्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
ते लाडकी बहीण योजना बंद करतील
महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध केला. त्यांना ही योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करतील आणि त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा मोदींनी केला.
प्रकल्पांमुळे रोजगार संधी...
मोदी म्हणाले की, आम्ही राज्याचा विकास करताना महाविकास आघाडीने केलेले खड्डे भरण्याचे काम करत आहोत. महाविकास आघाडीने ठाणे आणि मुंबईकडे दुर्लक्ष केले. वाहतूककोंडीकडे लक्ष दिले नाही. विकासकामे बंद केल्यामुळे मुंबई ठप्प होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, महायुतीचे सरकार आले आणि विकासकामांचा, वाहतुकीचा वेग वाढला. नवनवीन प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.