प्रभागात केवळ चिखलाचा रस्ता
By admin | Published: January 18, 2016 01:46 AM2016-01-18T01:46:47+5:302016-01-18T01:46:47+5:30
डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील सरावली शिवाजीनगरमधील नागरी समस्यांकडे नगरपरिषदेचे कायम दुर्लक्ष झाले आहे. या प्रभागाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रहिवाशांना चिखल तुडवत
शौकत शेख, डहाणू
डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील सरावली शिवाजीनगरमधील नागरी समस्यांकडे नगरपरिषदेचे कायम दुर्लक्ष झाले आहे. या प्रभागाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रहिवाशांना चिखल तुडवत घर गाठावे लागत आहे. शिवाजीनगर येथे जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे. मात्र, या शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांनाही चिखलातून शाळेत यावे लागत आहे. रस्ताच नसल्याने गटारेही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी पाणी साचून डपक्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
रस्त्याबरोबरच वीज आणि पाणी या समस्यांची रहिवाशांनी सवयच लावून घेतली आहे. शिवाजीनगर डहाणू-चारोटी मार्गाला जोडूनच आहे. या ठिकाणी नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे वाहनांचीही कायम वर्दळ असते. शिवाजीनगर येथे लोकवस्ती वाढू लागल्याने पादचाऱ्यांची संख्याही मोठी असते. पावसाळ्यात या प्रभागात जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने अर्धा किमी अंतर नाइलाजास्तव सक्तीने चिखल तुडवत जावे लागत आहे.
खाजणचा भागही याच प्रभागाला लागून आहे. हा भाग सखल असल्यामुळे भरतीचे पाणी परिसरात याच भागात तुंबते. मुख्य रस्त्यापासून फुगा कंपनीपर्यंत काँक्रीट रस्ता बनवण्यात आलेला आहे. पुढे अर्धा किलोमीटरपर्यंंंंंत आदिवासी लोकवस्ती असून ररत्याचे मध्येच काम थांबलेले आहे. त्याला खूप वर्षे लोटली, परंतु माती टाकण्याचे काम अजूनपर्यंत झालेले नाही. वारंवार खड्डे पडून रस्त्यांवर मातीची दलदल तयार झाली आहे. नगरपरिषदेने कायम दुर्लक्ष केल्यामुळे या परिसराची दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यात विजेचा लपंडाव असताना सर्पदंशाच्या भीतीमळे रात्रीचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागतो.
काही ठिकाणी रस्त्यावर दिव्यांची सोय नाही. नगरपरिषदेने इकडे लक्ष घालून मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे तसेच वीज आणि शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.