केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:36+5:302021-05-22T04:36:36+5:30

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही ...

Only with the navy did we reach home safely | केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

googlenewsNext

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही मदतीविना अडकून पडले होते. हे बार्ज वादळामुळे भरकटून मुंबईपासून पालघरपर्यंत गेले. अखेर नौदलाने या बार्जवरील सर्वांची सुखरूप सुटका केली. अंबरनाथमधील देवाशिष शेळके हे या बार्जवर अडकून पडले होते. सुटकेनंतर त्यांनी या थराराची कहाणी सांगताना अंगावर काटा आला; पण त्याचवेळी शेळके यांचे डोळेही पाणावले होते.

शेळके हे बॉम्बे हायमधील एका तेल विहिरीवर क्वालिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात त्यांच्यासह तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ जणांना घेऊन निघालेली बार्ज उधाणलेल्या भर समुद्रात अडकून पडली. वादळापासून बचाव करण्यासाठी या बार्जने एक नव्हे, तर तब्बल चार नांगर टाकले; मात्र वादळाचा तडाखा इतका जोरदार होता, की हे चारही नांगर तुटले आणि त्यांची बार्ज मुंबईहून थेट पालघरपर्यंत भरकटत गेले. या दरम्यान बार्जवर अन्न पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. शिवाय संपर्काचे कुठलेही माध्यम सुरू नव्हते. ५० तासांनी पालघरजवळील वरवडे समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचे बार्ज चिखलात रुतले. तिथून काही जणांनी नौदलाशी संपर्क साधला. यानंतर तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजावरील सर्वांची सुखरुप सुटका केली; मात्र या ५० तासात आपण साक्षात मृत्यू समोर पाहिल्याचे देवाशिष सांगतात. त्यातच त्यांच्याप्रमाणेच दुसऱ्या तेल विहिरीवर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी पी ३०५ ही बार्ज बुडाल्यामुळे देवाशिष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा धीर तुटला होता. अशा परिस्थितीत केवळ नौदलामुळेच आपण सुखरुप घरी आलो, असे ते म्हणाले; मात्र त्याचवेळी अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी परदेशात ज्याप्रमाणे तत्परतेने उपाययोजना केल्या जातात, त्याप्रमाणे भारतात केल्या जात नसल्याची खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली.

------------------------------------

आमच्याकडे फक्त बिस्किटेच होती

बार्ज धोकादायक स्थितीत असताना शेळके यांनी नौदलाचे मेजर फ्रँकलिन डिमेलो यांच्याशी संपर्क साधून त्यांना बार्जचे लोकेशन पाठविले. त्यामुळे मदत लवकर मिळाली आणि आमची सुटका झाली. बार्ज पाण्यात असताना आमच्याकडे खायलाही काही नव्हते, आम्ही केवळ बिस्किटाच्या मदतीने ५० तास काढले, असे देवाशिष शेळके यांनी सांगितले.

Web Title: Only with the navy did we reach home safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.