तीन रुग्णांवर एकच सर्जन करणार शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:20 AM2020-09-25T00:20:11+5:302020-09-25T00:20:24+5:30
जागतिक विक्र म : डॉक्टर पाहणार आॅनलाइन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जागतिक पातळीवर कानाच्या शस्त्रक्रियेचा एक विक्रम घडणार आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर हे एकाच वेळी तीन रुग्णांवर कानावरची क्लिष्ट शस्त्रक्रिया करणार आहेत. ठाण्यात होणारी ही शस्त्रक्रिया जगभरातले हजारो डॉक्टर थेट आॅनलाइन पाहणार आहेत.
बाहेरचा, मधला आणि आतला कान असे कानाचे तीन भाग आहेत. या तिन्ही भागांना वेगवेगळे आजार होतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतात. तीन रुग्णांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया कानाच्या तिन्ही भागांचे शस्त्रक्रिया होणे हे दुर्मीळच असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. एकाच वेळी कानाच्या तिन्ही भागांवर शस्त्रक्रिया जगात झालेली नाही. तिन्ही भागांवर शस्त्रक्रिया करणारे सर्जनही दुर्मीळ आहेत. काही दिवसांपूर्वी तीन डॉक्टरांनी तीन भागांवर शस्त्रक्रिया केल्या होत्या. येत्या रविवारी डॉ. भूमकर हे संपूर्ण कानावर शस्त्रक्रिया करणार आहेत. त्याचे आॅनलाइन थेट प्रक्षेपण होणार आहे. जन्मत:च ज्यांच्या बाहेरच्या कानात व्यंग असते, त्या रुग्णाच्या शरीरातील बरगडीचा भाग काढून त्याला कानाचा आकार देऊन नवीन कान तयार केला जातो आणि तो कान मूळ जागी लावला जातो आणि ऐकू येण्याची प्रक्रिया सुधरवतात.
सर्व प्रक्रिया जगभरातील डॉक्टरांना दुपारी २ ते ६ यावेळेत पाहता येणार आहे. दुपारी १० ते १ मध्ये आतील कानाची आणि दुपारी १ ते २ मध्ये मधल्या कानाची सर्जरी दाखविली जाणार आहे, असे डॉ. भूमकर यांनी सांगितले.