केवळ उंच इमारती म्हणजे विकास नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By धीरज परब | Published: December 30, 2023 09:51 PM2023-12-30T21:51:25+5:302023-12-30T21:51:32+5:30
हरती क्षेत्र वाढवून नागरिकांना प्रदूषणमुक्त व आनंददायी वातावरण निर्माण करा
मीरारोड - केवळ उंच इमारती उभारणे म्हणजे विकास नाही. हरित क्षेत्र वाढवून नागरिकांना प्रदूषणमुक्त व आनंददायी वातावरण निर्माण करा असे आदेश प्रशासनाला देत डिप क्लीन ड्राइव्ह मोहीम संपूर्ण राज्यात राबवणार असून ती लोकांची चळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भाईंदर मध्ये केले.
मुख्यमंत्री यांनी सुरु केलेल्या डिप क्लीन ड्राइव्ह मोहीमेची शनिवारी मीरा भाईंदर मध्ये सुरवात करण्यात आली . भाईंदर पूर्वेच्या नवघर नाका येथे मुख्यमंत्री शिंदे हे स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन त्यांनी हाती झाडू घेत सफाई केली व नंतर प्रेशर पंप ने रस्ता धुतला . यावेळी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन , ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडेय , महापालिका आयुक्त संजय काटकर आदी उपस्थित होते . यावेळी पालिकेच्या स्वच्छते बाबतच्या विविध उपकरणांची हाताळणी व माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली . गोल्डन नेस्ट येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनच्या कामाची पाहणी केली . पालिकेचं विविध विकासकामे व शासना कडून दिलेल्या निधीच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.
एकाच वेळी एक मोठा भाग घेऊन परिसरातील सर्व यंत्रणा व मनुष्यबळ एकत्र करून डिप स्वच्छता मोहीम राबवली गेली पाहिजे . नागरिकांना प्रत्यक्ष बदल दिसला पाहिजे . मार्च पर्यंत दर आठवड्याला हि मोहीम राबवणार असून पालिकां मध्ये स्पर्धा ठेवणार आहोत . सार्वजनिक शौचालये दिवसातून ५ ते ६ वेळा स्वच्छ झाली पाहिजेत . वर्षातून एकदा साफ केले जाणारे नाले ह्या मोहिमेत सुद्धा स्वच्छ करावे . बांधकामे व मेट्रो काम आदी ठिकाणी सिमेंट - धूळ पसरणार नाही यासाठी कामाचे क्षेत्र कव्हर करा .
भूगर्भातील पाण्याचा साथ वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावीपणे अमलात आणा . शहरी जंगल संकल्पना राबवा . हरित पट्टा जेवढा जास्त वाढवता येईल तेवढा वाढवा कारण तीच लोकांना ऑक्सिजन देणार आहेत . कचरा , धूळ , प्रदूषण पासून नागरिकांना दिलासा मिळेल असे काम करा . उद्याने , तलाव सुशोभित करा . नागरिकांना विरंगुळ्याची साधने उपलब्ध करून आनंददायी वातावरण निर्माण करा . नागरिकांची सांस्कृतिक व कले ची भूक भागवण्याचे काम सरकार , प्रशासन व लोकप्रतिनिधी करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .