विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखतो तोच खरा आदर्श शिक्षक : संपदा जोगळेकर-कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:42 PM2021-06-10T15:42:54+5:302021-06-10T15:43:33+5:30
आपल्या यशाचं श्रेय शिक्षकांनाच आहे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचं वक्तव्य.
ठाणे: "मला घडविण्यासाठी जोशी - बेडेकर महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी अतोनात मेहनत घेतली. मी नृत्य, अभिनय , निवेदन , लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात काम करू शकले. याचे श्रेय माझ्या शिक्षकांना आहे. माझ्यातील कौशल्य ओळखून त्यांनी मला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखतो तोच खरा आदर्श शिक्षक असतो," असे उद्गार अभिनेत्री आणि लेखिका संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांनी काढले. विद्या प्रसारक मंडळ संचालित जोशी बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या IQAC समितीने दिनांक ९ जून २०२१ ते दिनांक १३ जून २०२१ या दरम्यान कौशल्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा ९ जून २०२१ रोजी झूम मीटिंग या आभासी व्यासपीठावर पार पडला. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना संपदा जोगळेकर- कुलकर्णी बोलत होत्या.
या कौशल्य कार्यशाळेत घरबसल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ,पालकांना त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी व नवीन कला व व्यवहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी तब्बल अकरा विविध कला कौशल्यांचा या कार्यशाळेत समावेश करण्यात आला आहे. यात रांगोळी, वारली पेंटिंग, केक मेकिंग इ. बरोबरच डिजिटल कम्युनिकेशन ,बेसिक बँकिंग, क्रिप्टोकरन्सी इ .अशा व्यवहारिक कौशल्यांचा सुद्धा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला IQAC समितीच्या समन्वयक डॉ.प्रज्ञा राजबहादुर यांनी प्रेक्षकांशी या कार्यशाळेत बद्दल संवाद साधला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "कलेचे आपल्या आयुष्यातील स्थान व आयुष्य जगण्यासाठी कलेचे महत्त्व काय असते हे स्वअनुभवांचे किस्से सांगून विषद केले," असं संपदा जोगळेकर-कुलकर्णी म्हणाल्या.