विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखतो तोच खरा शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:40+5:302021-06-11T04:27:40+5:30
ठाणे : मला घडविण्यासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी आतोनात मेहनत घेतली. मी नृत्य, अभिनय, निवेदन, लेखन आणि दिग्दर्शन ...
ठाणे : मला घडविण्यासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी आतोनात मेहनत घेतली. मी नृत्य, अभिनय, निवेदन, लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात काम करू शकले. याचे श्रेय माझ्या शिक्षकांना आहे. माझ्यातील कौशल्य ओळखून त्यांनी मला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखतो तोच खरा आदर्श शिक्षक असतो, असे उद्गार अभिनेत्री, लेखिका संपदा जोगळेकर - कुलकर्णी यांनी काढले.
विद्या प्रसारक मंडळ संचालित जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समितीने ९ जून २०२१ ते दिनांक १३ जून यादरम्यान कौशल्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा ९ जून रोजी झूम मीटिंग या आभासी व्यासपीठावर पार पडला. तिचे उद्घाटन करताना संपदा बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक उपस्थित होत्या.
या कौशल्य कार्यशाळेत घरबसल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी नवीन कला व व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी तब्बल अकरा विविध कला कौशल्यांचा या कार्यशाळेत समावेश केला आहे. यात रांगोळी, वारली पेंटिंग, केक मेकिंग इ. बरोबरच डिजिटल कम्युनिकेशन, बेसिक बँकिंग, क्रिप्टोकरन्सी इ. अशा व्यावहारिक कौशल्यांचा सुद्धा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयक्यूएसी समितीच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा राजबहादूर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.