कल्याणमध्ये ग्राहकाला वीजबिल फक्त दोन लाख ६३ लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:49 AM2019-01-31T00:49:37+5:302019-01-31T00:49:53+5:30
वीज वितरण कंपनीचा प्रताप; डोळे पांढरे होण्याची वेळ
कल्याण : एखाद्या महिन्यात शंभर-दोनशे रुपयांनी बिल वाढवून आले, तरी जीव कासावीस होतो. मग, लाखांचे बिल अचानक हाती पडले तर काय होईल? पश्चिमेकडील गांधी चौकात राहणारे शैलेश मारू यांचे कुटुंब सध्या याचा अनुभव घेत आहेत. डिसेंबर-जानेवारीच्या बिलावरील दोन लाख ६० हजारांपेक्षा जास्त रक्कम पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आलेले हे बिल कसे भरावे, या विवंचनेत हे कुटुंब सापडले आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीतीने शैलेश यांच्या ६५ वर्षीय वडिलांनी तर धसकाच घेतला आहे.
गांधी चौक परिसरात राहणारे शैलेश हे ऐरोली येथील एका खासगी कंपनीत काम करतात, तर त्यांचे वडील विनोद मारू यांचे शिलाईचे दुकान आहे. मारू यांचा विजेचा घरगुती वापर केला जातो. त्यांच्या घरात चार पंखे, चार ट्युबलाइट, गरज भासल्यास इस्त्री व मिक्सरचा वापर केला जातो. घरात वातानुकूलित यंत्रणाही नाही. मारू यांना एप्रिल २०१८ मध्ये साधारण २१०० रुपयांचे वीजबिल आले. त्यानंतर, त्यांना सारख्याच रकमेची वीजबिले आली. त्यावर रीडिंगही सारखेच होते. त्यामुळे मारू यांनी या बिलांविषयी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जुने मीटर बदलून घेण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवून घेतले. त्यानंतरही त्यांना सारख्याच रीडिंगचे बिल आले. त्याची रक्कमही कमी करून न दिल्याने ते भरावे लागले. नवे इलेक्ट्रॉनिक वीजमीटर बसवल्यानंतर आलेल्या बिलाने तर मारू कुटुंबीयांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. जुन्या मीटरद्वारे १७ हजार युनिटचा वापर करण्यात आल्याचे दाखवून त्याचा समावेश करून डिसेंबरचे दोन लाख ६३ हजारांचे बिल काढण्यात आले.
याविषयीही मारू यांनी हरकत घेऊ न वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा तुमच्या बिलाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगून बोळवण केली. विजेची बिले वापरलेल्या युनिटपेक्षा जास्तीची आकारली जातात. वीजबिले भरली नाहीत तर लगेच वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्राहक जास्तीची बिले भरून मोकळे होतात. वास्तविक, वापर आणि त्यानुसार आलेले बिल त्याची होणारी शहानिशा त्यानंतर ग्राहकाला त्याने भरलेली जास्तीची रक्कम परत केली गेली, असे एकही उदाहरण सापडत नाही. त्यामुळे वीजकंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याची नाराजी मारू कुटुंबीयांनी व्यक्त केली.
‘शहानिशा करून निर्णय घेऊ ’
वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मारू यांच्या तक्रारीची नोंद घेऊन शहानिशा केली जाईल. शहानिशा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.