उघडा बोडका मुंडा डोंगर झाला हिरवागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:06+5:302021-07-01T04:27:06+5:30
ठाणे : गेली कित्येक वर्षे उघडा बोडका असलेला घोडबंदर येथील मुंडा डोंगर आता हिरवागार झाला आहे. हरियालीच्या १५ वर्षांच्या ...
ठाणे : गेली कित्येक वर्षे उघडा बोडका असलेला घोडबंदर येथील मुंडा डोंगर आता हिरवागार झाला आहे. हरियालीच्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, या डोंगरावर आता करंज, मोह, बेहडा, बाहवा, अर्जुन, आवळा, जांभूळ, आपटा अर्जुन इत्यादी झाडे ही ३० फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. या डोंगरावर आता ४०० झाडे वाढलेली दिसत आहेत. हरियालीने आपले उद्दिष्ट पूर्णत्त्वास नेले असून, या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
घोडबंदर रोड येथील गायमुख चेकनाक्याच्या आसपास आलेला मुंडा हा डोंगर असून, या डोंगरावर गेली अनेक वर्षे झाडे नसल्याने स्थानिकांनी या डोंगराला मुंडा डोंगर म्हणजेच टकल्या डोंगर असे नाव ठेवले. तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येतो. २००३च्या सुमारास हरियाली या संस्थेने ही जागा हेरली आणि आपल्या उद्दिष्टानुसार तेथे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्याचे योजिले. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे झाडी नाहीत म्हणून पावसाळ्यात माती वाहून जाते. मातीची धूप होते. माती नाही म्हणून झाडे नाहीत, असे दुष्टचक्र मोडणे म्हणजे हरियालीसाठी आव्हानच होते. झाडे लावण्यासाठी नऊ इंच ते एक फुटाचा खड्डा करणे म्हणजे अत्यंत जिकरीचे काम. त्यामुळे रोपे लावण्याचा पर्याय सोडून बीजरोपणामार्फतच वृक्षलागवड करावी, असे संस्थेने ठरविले. रोपांपेक्षा गवत झपाट्याने वाढत असल्याने गेले दोन वर्षे प्रयत्नांना यश येत नव्हते. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये गवत वाळले की, दुर्दैवाने काही समाजकंटक वणवा पेटवीत, अशी खंत हरियालीचे हंगामी अध्यक्ष प्रदीप लोथे यांनी व्यक्त केली. संस्थेने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आणि गवत वाळले की, त्यांनीच कापणी करायचे ठरविले आणि याचे उत्तम परिणाम दिसू लागला.
आज २००५मध्ये लावलेली करंजाची रोपटी पंचवीस तीस फूट उंचीचे वृक्ष झाले आहेत. लावलेली मोहाचीही रोपटी २० फुटांपर्यंत उंच झाली आहेत. करंजाची झाडे तर आता मदर ट्रीज झाली आहेत. त्यांच्यापासून हजारो शेंगासुद्धा मिळायला सुरुवात झाली आहे, असे संस्थेने सांगितले.
---------------------------
पावसाळ्याच्या सुरुवातीला बियांची किंवा छोट्या रोपांची लागवड केल्यानंतरची निगराणी म्हणजे फक्त गवत कापणे एवढेच हरियालीच्या हातात. रोज किंवा अधूनमधून पाणी घालणे, हेसुद्धा जवळपास अशक्यप्रायच. त्याबरोबर हरियालीने हेदेखील ठरवले की, कुठल्याही प्रकारची रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा उपयोग करायचा नाही. निसर्गाला त्याच्या कलेप्रमाणे वाढू द्यायचे. याचे तसे बघितले तर दोन तोटेच होते. पहिला म्हणजे मातीच मुळात कमी असल्यामुळे आणि तिचा कस कमी असल्यामुळे सुपीक जमिनीत जेवढ्या जोमाने झाडे वाढतात, त्यापेक्षा फारच कमी प्रमाणात झाडांची वाढ होत होती आणि दुसरे म्हणजे कमी कठीण, नाजूक जातीचे वृक्ष जसे आंबा, गुलमोहोर वगैरेसारखे वृक्ष येथे उन्हाळ्यात तग धरू शकले नाहीत. पण, निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करायचेच नाही असे ठरले. इतक्या वृक्ष विविधतेमुळे दर दीड ते दोन महिन्यांनी जंगलाचे रूप बदललेले दिसते आणि प्रत्येक वेळी एक वेगळाच आनंद मिळतो.
- प्रदीप लोथे
-------------