परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर 'कचरा बेट' ठाणेकरांसाठी खुले करा!

By अजित मांडके | Published: March 27, 2023 07:46 PM2023-03-27T19:46:10+5:302023-03-27T19:46:32+5:30

मनसेचे पालिका प्रशासनाला उपहासात्मक आव्हान

Open 'Garbage Island' to Thanekar on the lines of foreign tourism taunts MNS | परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर 'कचरा बेट' ठाणेकरांसाठी खुले करा!

परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर 'कचरा बेट' ठाणेकरांसाठी खुले करा!

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मालदीव, बाली आणि सिंगापूर येथे कचऱ्याच्या ढिगावर शास्रोक्तक पद्धतीने बेट तयार करून पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू बनवण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे अनोखे बेट तयार झाले आहे. या बेटाचे लवकरच लोकार्पण करून ठाणेकरांसाठी पालिका प्रशासनाने नवीन पर्यटन केंद्र खुले करावे, अशी उपहासात्मक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाने अनोख्या आंदोलनानंतर केली. यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नाल्यातील या कचऱ्याच्या बेटावर उतरून पालिका प्रशासनातील निद्रिस्त अधिकाऱ्यांविरोधात सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली.

लवकरात लवकर येथील कचरा स्वच्छ न केल्यास हे कचऱ्याचे ढीग पालिका अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर नेऊन टाकले जातील असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.  
ठाण्यातील गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा येथील वीस हजार नागरिकांना या नाल्यातील कचऱ्याच्या ढिगामुळे त्रास होतो. याठिकाणी कचरा साठून बेट तयार झाले आहे. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी पालिकेच्या वतीने या बेटाचे नामकरण करावे तसेच ठाण्यातील नागरिकांना कचऱ्याचे बेट बघण्याचा अनुभव उपलब्ध करून द्यावा, अशी बोचरी टीका आंदोलनानंतर केली. नागरिकांना महानगरपालिकेच्या स्वच्छ ठाणे धोरणाची पुरेपूर माहिती या बेटामुळे मिळेल व त्यांना विदेशात जे बेट बघण्याचा अनुभव येतो तोच अनुभव ठाण्यात घेता येईल, असा टोलाही शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी लगावला. याप्रसंगी मनसेचे दत्ता चव्हाण, मीनल नवर, मनीष सावंत, हिरा पासी, कामिनी शेवाळे, अर्चना शिर्के, निलेश माळी आदी उपस्थित होते.

पालिकेच्या धोरणालाच हरताळ- नवीन अर्थसंकल्पामध्ये पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ ठाणे या लेखा शीर्षक अंतर्गत ठाणे शहर कचरा मुक्त करण्यासाठी अंदाजे ८५ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. तसेच ठाण्यातील कचरा संकलित करण्यासाठी उभारण्यात आलेले सीपी तलाव येथे हस्तांतरण केंद्र अद्यावत करण्याच्या अनुषंगाने २३ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. पालिकेच्या वतीने वर्षाला करोडो रुपये फक्त घनकचरा विभागाच्या विविध प्रकल्पावर खर्च केले जातात. तसेच दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये ठाणे शहर कचरामुक्त करण्यासाठी निधी प्रस्तावित केला जातो. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ठाणे कचरा मुक्त होण्यापासून वंचित राहते, असेही शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले.

Web Title: Open 'Garbage Island' to Thanekar on the lines of foreign tourism taunts MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.