न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेने अडवलेले मैदान तात्काळ सर्वसामान्यांसाठी खुले करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:42 PM2021-02-08T16:42:50+5:302021-02-08T16:43:13+5:30

पालिका प्रशासनाचे शाळा व्यवस्थापनाला आदेश, मनसेच्या दणक्यानंतर आठवडाभरात भूखंड मोकळा होणार

Open the grounds immediately blocked by New Horizon Scholars School | न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेने अडवलेले मैदान तात्काळ सर्वसामान्यांसाठी खुले करा!

न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेने अडवलेले मैदान तात्काळ सर्वसामान्यांसाठी खुले करा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाच्या भूखंडावर सुरु असलेला खासगी शाळेचा खेळ मनसेच्या दणक्यानंतर आटोपला आहे. वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने मैदान अडवून ठेवल्याने या परिसरातील लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत होते. तसेच नागरिकांना जॉगिंगसाठी उपवन तलावाचा रस्ता धरावा लागत होता. याप्रश्नी मनसेने आवाज उठवल्यानंतर अवघ्या आठ दिवसात खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने न्यू होरायझन स्कॉलर्स स्कुल व्यवस्थापनाला पत्र धाडत मैदान सात दिवसात महापालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.    

ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखडयानुसार वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६००  चौमी
 (१.६१ एकर) क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान नियोजित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्याने रस्त्यावरच खेळाचा 'डाव' मांडावा लागतो. मात्र मैदानच खुले नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी याप्रश्नी आवाज उठवला. या जागेवर न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने अतिक्रमण केलेले आहे. पालिकेच्या शहर विकास विभागामार्फत याबाबत स्पष्ट निर्देश असताना देखील शाळेने मैदानाचा वापर स्वत: करिता केलेला आहे. तसेच मैदान ठाणे पालिकेस हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे आठ दिवसात मैदान सर्वसामान्यांसाठी खुले न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा दणका दिला जाईल, अशा इशारा संदीप पाचंगे यांनी दिला होता. याबाबत पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त, महापौर, शिक्षण समिती सभापती आणि न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यव्हार करताच जागे झालेल्या ठाणे पालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने शाळा व्यवस्थापनाला पत्र धाडले. या मैदानाचा सार्वजनिक वापर होणे आवश्यक असताना ते खुले केलेले नाही. संबंधित मैदान सर्वसासामान्यांसाठी खुले करावे अथवा महापालिकेस सात दिवसात हस्तांतरित करावे, असे स्पष्ट आदेश पालिका प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाला पत्राद्वारे दिले आहेत.

इतर शाळांनी सावध व्हावे!
ठाण्यातील विविध  शाळांनी अशाच पद्धतीने बेकायदा बांधकामे केली आहेत. त्यांची यादी मनसेकडे असून विद्यार्थ्यांना तसेच स्थानिकांच्या हक्कांच्या आड येणाऱ्या शाळांना भविष्यात मनसे स्टाईल दणका दिला जाईल. 
- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे

Web Title: Open the grounds immediately blocked by New Horizon Scholars School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.