उघड्या गटारांमुळे बदलापुरातील नागरिकांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 10:56 PM2020-02-27T22:56:53+5:302020-02-27T22:56:58+5:30
रस्त्यावरील गटाराची दुरूस्ती करण्याची मागणी
बदलापूर : मागील तीन वर्षापूर्वी पावसाचे पाणी तुंबल्याने प्रभाग क्रमांक २४ मधील भगवती हॉस्पिटलसमोरील गटारे तोडण्यात आली होती. मात्र अद्याप या गटारांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी गटारावर झाकणेही बसविण्यात आलेली नाहीत. या ठिकाणी काँक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने उघडया गटारांमुळे आजूबाजूने येणारे जाणारे नागरिक, जनावरे या गटारात पडण्याची शक्यता आहे . त्यामुळे या रस्त्यावरील गटाराची दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
बदलापूरचा झपाटयाने विकास होत आहे . मात्र शहरातील वाढत्या समस्यांना नागरी सुविधा पुरविण्यात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व प्रशासन कूचकामी ठरत आहेत. शहराच्या अंतर्गत अनेक रस्त्यावरची स्थिती यापेक्षाही वाईट आहे. काँक्रिटचे रस्ते व डांबरीकरण केल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी पदपथावर गटार बांधण्यात आले आहे. मात्र या गटारांकडे दुर्लक्ष होत आहे. गटारातून पाणी वाहत नसल्याने पावसात सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. त्यातच गटारात गाळ साचत असल्याने योग्य प्रवाहाने पाणी वाहून जाण्याचा मार्ग राहिलेला नाही. त्यामुळेच पावसात पाणी तुंबण्याचे प्रकारही होतात. पाणी तुंबण्याचे प्रकार अधिक घडल्याने या ठिकाणचे गटार तोडण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मात्र पावसाळा झाल्यावर त्याची योग्य दुरुस्ती करण्याची गरज होती. मात्र ती अद्याप केलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्याकडेला असलेला हा उघडा नाला नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.