नागरिकांच्या सोयीसाठी पदपथ मोकळे करा-पी. वेलारासू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:25 PM2017-11-13T19:25:25+5:302017-11-13T19:25:36+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करा, असे आदेश महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिले आहे.
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करा, असे आदेश महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिले आहे. आज पार पडलेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका अधिकारी व प्रभाग अधिका-यांच्या प्रभावी फेरीवालाविरोधात कारवाई राबविल्याने आयुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांना केवळ स्टेशन परिसर मोकळा नको आहे तर त्यांच्या चालण्यासाठी तयार केलेले पदपथही मोकळे हवे आहेत. सर्व प्रभाग अधिका-यांनी पदपथ मोकळे करण्याची कारवाई करावी. ज्या दुकानदारांनी पदपथ काबीज करून व्यवसाय थाटला आहे. अशा दुकानदारांनी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा महापालिका कारवाई करणार आहे. या कारवाईचा खर्चही महापालिका संबंधित दुकानदारांकडूनच वसूल करणार आहे. याची अतिक्रमण करणा-या दुकानदारांनी दक्षता घ्यावी असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. महापालिकेकडे हस्तांतरित झालेले व आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्यात यावेत.
नगररचना विभागाने अशा आरक्षित व महापालिकेस हस्तांतरित झालेल्या भूखंडाची यादीच प्रभाग अधिका-यांना उपलब्ध करून द्यावी. ज्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणो झालेली आहेत. ते भूखंड या महिन्याअखेरीस मोकळे करीन द्यावेत. त्यावरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मोहिम हाती घ्यावी. मालमत्ता करवसुलीचा आढावा घेताना ज्या मोबाईल टॉवर कंपन्यांनी त्याचा कर महापालिकेकडे भरलेला नाही. त्या मोबाईल टॉवरच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी कर निर्धारक व संकलक अनिल लाड यांना दिले आहे.
महापालिकेच्या अनेक पदपथांवर अतिक्रमण आहे. अनेक पदपथावर चायनीज गाड्यांनी त्यांचे हॉटेल थाटले आहे. तसेच वडापावच्या गाड्या सुरू आहेत. आयुक्तांच्या आदेशापश्चात त्यांचे धाब दणाणले आहेत. अनेक दुकानदारांनी त्यांच्या शेड पदपथावर आणलेल्या आहेत. त्यांच्या शेडने पदपथ व्यापलेले आहेत. याशिवाय त्यांचे सगळे साहित्य त्यानी पदपथावर ठेवले आहे. त्यामुळे पादचा-यांना पदपथ असूनही त्याचा वापर करता येत नाही. पुन्हा रस्तावरून चालत जीव धोक्यात घालूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. हे चित्र कल्याण, डोंबिवली स्टेशन परिसरात नियमित पाहावयास मिळत आहे. आयुक्तांच्या आदेशापश्चात किती पदपथ मोकळे होती याकडे पादचा-यांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांच्या आदेशाचे महापालिका वर्तुळातून स्वागत होत आहे.
मनसेच्या इशा-या पश्चात महापालिका हद्दीतील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर सुरू असलेली रेल्वे व महापालिकेची कारवाई ही सातत्य ठेवून आहे. त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. परिसर फेरीवालामुक्त झाला असला तरी आता मोकळ्य़ा जागेत रिक्षा चालकांचा शिरकाव वाढला आहे. त्यामुळे वाहतूक व आरटीओने बेशिस्त व रस्ता व्यापणा-या, वाहतूक अडथळा निर्माण करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. महापालिका व रेल्वे सक्रिय झालेली असताना आता आरटीओ व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यात मोकळ्या जागेत रिक्षा चालकांचे फावले आहे.