स्वच्छ ठाण्याकरिता लगीनघाई; शेवटच्या क्षणापर्यंत साफसफाई, बांधकाम आणि नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:45 AM2018-02-18T02:45:46+5:302018-02-18T02:46:04+5:30
स्वच्छता अॅपच्या सर्व्हेत क्रमांक-१ वर असलेल्या ठाणे महापालिकेची ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ करिता दिल्लीहून आलेल्या पाहणी टीमचे समाधान करताना दमछाक होत आहे. दिल्लीच्या टीमकडे वर्षभर संपूर्ण शहराची स्वच्छता होत असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी, शनिवारी प्रत्यक्ष पाहणीच्या दिवशी ज्या ठिकाणी दिल्लीची टीम जाणार होती, त्याच्या काही मिनिटे अगोदरपर्यंत पालिकेचे अधिकारी साफसफाईचे नियोजन करताना दिसले.
ठाणे : स्वच्छता अॅपच्या सर्व्हेत क्रमांक-१ वर असलेल्या ठाणे महापालिकेची ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ करिता दिल्लीहून आलेल्या पाहणी टीमचे समाधान करताना दमछाक होत आहे. दिल्लीच्या टीमकडे वर्षभर संपूर्ण शहराची स्वच्छता होत असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी, शनिवारी प्रत्यक्ष पाहणीच्या दिवशी ज्या ठिकाणी दिल्लीची टीम जाणार होती, त्याच्या काही मिनिटे अगोदरपर्यंत पालिकेचे अधिकारी साफसफाईचे नियोजन करताना दिसले. परिणामी एरव्ही, नेहमीच अस्वच्छ दिसणारे परिसर शनिवारी दिल्लीचे पाहुणे पोहोचण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर चकाचक करण्यात आले होते. कळव्यात तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या तुटलेल्या पायºया काही तास आधी बांधण्यात आल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रविवार आणि सोमवार असे आणखी दोन दिवस दिल्लीची टीम प्रत्यक्ष पाहणी करणार असून त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत ठाणे शहराचा क्रमांक ठरणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. ठाण्यात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून गुरु वारी टीम ठाण्यात दाखल झाली आहे. गुरु वारी आणि शुक्र वारी या टीमने स्वच्छतेसंदर्भात ठाणे महापालिकेने कागदोपत्री काय नियोजन केले आहे, याची तपासणी केली. त्यानंतर, शनिवारी ठाण्याच्या विविध ठिकाणी जाऊन या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीसाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये एका टीमने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांची पाहणी केली, तर दुसºया टीमने वागळे भागात जाऊन झोपडपट्टी विभागाची पाहणी केली. सकाळी उथळसरमध्ये आझादनगर या झोपडपट्टी भागाची पाहणी करून त्या परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यानंतर, आंबेघोसाळे तलावाचीदेखील पाहणी करण्यात आली. या दोन ठिकाणची पाहणी केल्यानंतर या टीमने आपला मोर्चा कळव्याला वळवला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची पाहणी आतमध्ये जाऊन केली. एरव्ही, या सार्वजनिक शौचालयाच्या सीट्स घाण असल्या तरी ही टीम यायच्या आधी मात्र सर्व शौचालये चकाचक करण्यात आली असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.
रस्त्यावरील वाहने हटविली
वागळे भागातदेखील एका टीमने काही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यामध्ये झोपडपट्टी भागाची तसेच औद्योगिक परिसराचीदेखील पाहणी करण्यात आली.
रस्त्यावर कोणत्याही प्रकारे अस्ताव्यस्त पार्क केलेली वाहने दिल्लीच्या टीमच्या निदर्शनास येऊ नयेत, म्हणून तीदेखील काही ठिकाणी रस्त्यावरून हटवली होती.
रँकमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी पालिकेच्या अधिकºयांनी प्रत्यक्ष पाहणीच्या वेळीच अधिकाºयांचे फोनवर नियोजन सुरू होते.
ज्या पुढच्या ठिकाणी या दिल्लीच्या टीमची पाहणी असेल, त्याच्या आधीच पालिका अधिकारी फोन करून तिकडचे नियोजन करायला सांगत होते.
तीन टप्प्यांत घेणार आढावा
दिल्लीहून आलेल्या टीमच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये स्वच्छतेचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये कागदपत्रे तपासली जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्वच्छतेचा आढावा घेतला जाणार आहे. तिसºया टप्प्यात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीमध्ये बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, उद्यान, महत्त्वाची ठिकाणे, सोसायटीचा परिसर अशी विविध ठिकाणे तपासली जाणार आहेत. प्रत्येक टप्प्यासाठी मार्क दिले जाणार असून त्यानंतर रँक ठरवली जाणार आहे.
डस्टबिन वाढविले, शौचालयात जिओ
महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन स्वच्छतेचा आढावा ही टीम घेणार आहे. यासाठी संपूर्ण एक आठवडा ही टीम ठाण्यात राहणार आहे. गेल्या वर्षभरात स्वच्छतेबाबत राबवलेल्या उपाययोजनांमध्ये शहरातील सर्व शौचालये तसेच कचºयाची ठिकाणे जिओ टॅग करण्यात आली आहेत. याशिवाय, शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचºयाचे डबे तसेच कचरा उचलून नेणाºया गाड्यांमध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्टेशन परिसरात असणाºया दुकानांबाहेर सर्वांना कचºयाचे डबे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तातडीने केली कामे
विशेष म्हणजे या शौचालयांच्या तुटलेल्या पायºयांकडे आतापर्यंत पालिका प्रशासनाचे लक्ष गेले नव्हते. मात्र, ही टीम येणार म्हणून एका दिवसात या पायºया बांधण्यात आल्या आहेत. शौचालयाबाहेरील कोबादेखील काही तास आधीच बांधण्यात आला होता. महिलांसाठी शौचालय वापरणे मोफत असताना या शौचालयामध्ये महिलांनादेखील पैसे आकारण्यात येत असल्याची माहिती या शौचालयाचा वापर करणाºया एका महिलेने दिली. दरासंदर्भात कोणत्याही प्रकारचा फलकदेखील या ठिकाणी लावण्यात आला नव्हता. दुसरीकडे एरव्ही हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या एफओबीची विशेष सफाई करण्यात येत नव्हती.मात्र, तोदेखील एक दिवस आधी संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आला होता. हॉस्पिटलच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता प्रत्येक दिवशी सकाळी केली जाते. मात्र, शनिवारी दोन वेळा संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे हॉस्पिटलचा संपूर्ण परिसरच स्वच्छ झाला होता.
रँक सुधारण्यासाठी पथके
२०१६ च्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सतराव्या क्र मांकावर असणारे ठाणे शहर २०१७ च्या सर्वेक्षणामध्ये मात्र ११६ व्या क्र मांकावर फेकले गेले. त्यानंतर, यामध्ये सुधारणा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. शहरातील स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच त्या केल्या असल्या तरी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मात्र नियोजन करताना पालिका अधिकाºयांची ऐनवेळी धावपळ दिसून आली.