ठाण्यात खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा संपन्न, ‘इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क’ सर्वोत्कृष्ट एकांकिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:55 PM2017-12-06T15:55:49+5:302017-12-06T16:01:03+5:30
कोकण विभागीय खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला.
ठाणे: कोकण कला अकादमी आणि संस्कार आयोजित कोकण विभागीय खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत दादर येथील नाट्यकिर्तीची ‘इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ठाण्याच्या नाट्यमय संस्थेची ‘क ला काना का’ या एकांकिकेने द्वीतीय तर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. या पारितोषिक सोहळ््याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा सन्मान करण्यात आला.
पारितोषिक वितरण सोहळ््याला आ. संजय केळकर, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष दीपक करंजीकर, कोकण कला अकादमीचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, सदस्य विक्रांत महाडीक, वाडेकर संस्कारचे सेक्रेटरी संतोष साळुंके आदी उपस्थित होते. मोहन जोशी यांनी स्पर्धेचे आणि आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘मॅडम’ व सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या ‘पाझर’ या एकांकिकांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘शुभयात्रा’ या एकांकिकेला विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले. रोहीत मोहिते (शुभयात्रा) हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर उत्तेजनार्थ म्हणून विशाल चव्हाण (क ला काना का) तर सिद्धेश उपकारे (सेकंड इनिंग) यांना गौरविण्यात आले. सायली बांदकर (निर्वासित) ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. उत्तेजनार्थ म्हणून सोनाली मगर (दर्दपोरा), स्मितल चव्हाण (मॅडम) तसेच, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून साबा राऊळ (इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क), सर्वोत्कृष्ट लेखक ओमकार राऊत (शुभयात्रा), सर्वोत्कृष्ट नेपथ्य सानिक (निर्वासित), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत निरांत, अरविंद, उन्मेश (पाझर), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना श्याम चव्हाण (दर्दपोरा) यांना गौरविण्यात आले. परिक्षकांच्यावतीने विनायक दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, व्यक्ती आणि वल्ली नाटकातील बालकलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन आणि या नाटकाचे दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. ढवळ यांनी प्रास्ताविक तर देवराज साळवी याने निवेदन केले. यंदाच्या स्पर्धेचे १२ वे वर्ष होते. सहा जिल्ह्यांची घेण्यात आलेली प्राथमिक फेरी ठाणे, पालघर, रत्नागिरी या तीन केंद्रांवर पार पडली. २८ नाट्यसंस्थांनी यात भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी १० एकांकिकांची निवड करण्यात आली.