कळव्यातील पूल वाहतुकीसाठी खुला करा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 10:41 AM2022-07-23T10:41:52+5:302022-07-23T10:42:20+5:30
ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते.
ठाणे - पावसाळा सुरु झाल्यापासून ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे आणि शहरात येणारी जड वाहने याला कारणीभूत आहेत. याच विषयावर लक्ष वेधत राष्ट्रवादी नेते माजी मंत्री डॉ जितेंद्र आव्हाडांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळव्यातील तिसरा पुल बांधून तयार असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून विशिष्ट वेळेतच जड वाहनांना परवानगी देण्याची मागणी केली आहे.
पत्रामध्ये आव्हाड म्हणतात "2013-14 साली जेव्हा असीम गुप्ता हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, तेव्हा कळव्याचा खचल्यानंतर दुस-या पुलाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता त्यावर पहिला पुल उपाय म्हणून कळवा खाडीवर तिस-या पुलाची निर्मिती करावी अशी मी त्याच्याकडे मागणी केली आणि त्याला असीम गुप्ता यानी त्वरीत मान्यता दिली व त्या कामाला सुरुवात देखील झाली. कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता जवळ-जवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातल्या कळव्यात प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. कारण कळव्यात कुठल्याही रस्त्यांवर खड्डे नाहीत. परंतु मात्र ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते. खरतरं उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.आतामात्र सगळ असाह्य व्हायला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहेत. नोकरीला जाण्यासाठी उशीर होत आहे आणि ही अस्वस्थता आता शिगेला पोहचली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नागरिकांची काहीच चूक नाही. चूक कोणाची हेही मला सांगायचे नाही. परंतु कमीत कमी जो ब्रिज तयार झाला आहे तो नागरिकांच्या वापरासाठी सुरु करा. जेणेकरुन थोडीफार वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. आपण त्वरीत हा निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. खरतर पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा आदेश मानायला पाहिजे व तशी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. पण, हे कितीवेळा आणि कोणाला सांगायचे. उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणार असाल तर मग तक्रारच कोणाकडे करायची. मला वाटते कायद्याचे पालन व्हायला हवे. उच्च न्यायालयाचे आदेश मानायला हवेत." अशी मागणी आव्हाडांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्ताकडे केली आहे. त्यामुळे हा पूल कधी सुरु होईल हे पाहणं महत्वाचं आहे