पक्षाची प्रतिमा डागाळली
By Admin | Published: October 14, 2015 02:35 AM2015-10-14T02:35:27+5:302015-10-14T02:35:27+5:30
काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षातर्फे ५४ जणांची उमेदवारी जाहिर केली. त्यामध्ये सात विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली
अनिकेत घमंडी, डोंबिवली
काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षातर्फे ५४ जणांची उमेदवारी जाहिर केली. त्यामध्ये सात विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली. उर्वरीतपैकी एका विद्यमान नगरसेवकाने तिकिट मागितलेच नाही. तर अन्य एकाने वेळोवेळी पक्ष नियमांना बगल दिल्याने त्यांचे तिकिट कापल्याचे सांगण्यात आले. अशाच पद्धतीने जे पक्षाला सोडून गेले अशा नगरसेवकांमुळेही पक्षाला फटका बसणार आहे. सध्याच्या मतदानाचा ट्रेड बघता, पक्षानेही पारंपारीक पद्धतीला मोडून काढत आता युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दिल्याने कदाचित पक्षाला उभारी मिळेल असा निरीक्षकांचा दावा आहे. अशा दृष्टीने एकंदरित लोकसभा-विधानसभा आणि गेल्या काही दिवसातील पक्षाची झालेली पडझड बघता ही निवडणुक त्यांच्या अस्तित्वाची ठरणार आहे.
त्यामुळे गेल्या निवडणुकीत जेवढे नगरसेवक निवडून आले होेते तो १५चा आकडा पुन्हा या निवडणुकीत गाठण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. श्रेष्ठींनाही त्यांच्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांच्या मर्यादा माहिती आहेत. परंतु तरीही भाजपा झ्र शिवसेना वेगळी लढल्यास त्यांच्या बंडाळीचा लाभ उठवण्याचा वरिष्ठांचा मानस आहे. त्या पद्धतीने त्यांनी उमेदवार दिले आहेत.
कल्याण पेक्षाही पक्षाला डोंबिवलीत जास्त फटका बसला आहे. शिवाजी शेलार, रवी पाटील, उदय रसाळ, विश्वनाथ राणे यांच्यासारखे पक्षाचे आधारस्तंभ असलेल्यांनी पक्ष सोडल्याने पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व घडामोडी निवडणुकीच्या काळात घडल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविणे व उमेदवारांचे नैतिक धैर्य टिकवितांना पक्षाची कसोटी लागणार आहे. त्यातच सचिन पोटे यांचे नगरसेवक पद अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे रद्द करण्यात आल्यानेही पक्षाची प्रतिमा डागळली आहे.
मतदारांच्या दृष्टीकोनातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुका होत नसतात, तर व्यक्तिगत पातळीवर असलेला लोकप्रतिनिधीचा जनाधार त्या त्या भागात किती आहे, त्याचे काम कसे आहे, त्याची नागरिकांप्रती आत्मियता, प्रशासनावर दबाव हे सर्व निकष महत्वाचे असतात. त्यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, ह्रदयनाथ भोईर, कल्याणमध्ये पोटे दाम्पत्य, गीध यांच्यासह अजून काहीं उमेदवार बाजी मारतील असा विश्वास पक्षासह त्या उमेदवारांना आहे.
इंदिरानगर या स्लम भागात शेलार यांचेच वर्चस्व आहे. आता विद्यमान नगरसेवक सदाशिव शेलार यांनी त्यांच्या मुलाला व कुटुंबातीलच अन्य एका महिला सदस्याला तिकिट दिले आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी कोण बाजी मारणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशा काही जागांसह यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून काही जागा मिळाल्या तर किमान जेवढे नगरसेवक होते त्याच्या आसपास जाण्याची अपेक्षा पक्षश्रेष्ठींना आहे. श्रेष्ठींना जरी भरपूर काही वाटत असले तरीही प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या रिंगणात आघाडीला मतदार किती साथ देतात, यावरच त्या दोन्ही घटक पक्षांचे केडीएमसीतील भवितव्य अवलंबून आहे.