निवडणुकीपूर्वी इमारतीचे उद््घाटन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:58 PM2020-02-11T23:58:38+5:302020-02-11T23:58:41+5:30
काम अंतिम टप्प्यात : भव्य इमारत असूनही जागा पडणार कमी, तळमजल्यावर वाहनतळ
पंकज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेची नवीन प्रशासकीय भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यातील महापालिकेच्या अनुषंगाने या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. दोन मजली इमारत आणि तळमजल्यावर वाहनतळ अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी पालिकेचे सर्व कार्यालय या इमारतीत सामावून घेता येणार नाही. त्यामुळे एकाच इमारतीत सर्व कामकाज करण्याचे स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नाही.
अंबरनाथ नगरपालिकेची प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी पालिकेने १२ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला होता. सध्या असलेल्या पालिका कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या मैदानावरच नव्या इमारतीचे बांंधकाम सुरू आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत कामे सुरू आहेत. या कामासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. १२ कोटींव्यतिरीक्त पालिकेअंतर्गत कामकाजासाठी तीन ते चार कोटींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. टप्प्याटप्प्याने त्याचे काम सुरू होणार आहे. महिन्याभरात हे काम पूर्ण करून नव्या इमारतीत कार्यालय सुरु करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
या इमारतीमधील काही कार्यालयांचे काम पूर्ण करून त्या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधी त्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे या इमारतीत प्रत्येक अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांच्यासाठी प्रशस्त कार्यालय आहेत. सोबत स्थायी समिती सभागृह, नगराध्यक्षांच्या बैठकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. १२५ नगरसेवक बसतील इतकी आसनव्यवस्था केली आहे. इमारतीच्या दोन मजल्यांमध्ये सर्व कार्यालय बसविता येणार नाही याची कल्पना आल्यावर आणखी दोन मजले वाढविण्यासाठी विषयही घेतला होता. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत विरोधामुळे हे काम करता आले नाही.
घुमटामुळे येणार अडचणी
नव्या प्रशासकीय इमारतीवर आणखी दोन मजले वाढविल्यास संर्पूण कार्यालय या इमारतीत स्थलांतरीत करता येणे शक्य होते. मात्र या दोन मजल्यांवरच आता पालिकेने नियोजनाप्रमाणे घुमट तयार केल्याने आता त्या ठिकाणी वाढीव बांधकाम करतांना अडचणी येणार आहेत.