मुब्रा खाडीतील कारवाईत जिल्हा प्रशासनाकडून दीड कोटींच्या रेतीसह मुद्देमाल खाडीत नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 08:38 PM2021-04-24T20:38:36+5:302021-04-24T20:39:22+5:30
आजच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. मुंब्रा व खार्डी खाडीमध्ये केलेल्या या कार्यवाहीमध्ये चार संक्शन पंप व सात बार्ज खाडीतच नष्ठ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे : येथील मुंब्रा व खार्डी खाडीत अनधिकृत रेतीचे उत्खनन करून पर्यावरणाचा र्हास सुरु केला आहे. याविरोधातील तक्रारीस अनुसरुन ठाणे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशास अनुसरून उपविभागीय अधिकारी युवराज बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली या खाडीत धडक कारवाई करुन दीड कोटींच्या रेतीसह मुद्देमाल हस्तगत करुन तो खाडीतच नष्ट केला, असे तहसीलदार मुकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.
आजच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. मुंब्रा व खार्डी खाडीमध्ये केलेल्या या कार्यवाहीमध्ये चार संक्शन पंप व सात बार्ज खाडीतच नष्ठ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या कारवाईच्या वेळी चार संक्शन पंप व सात बार्ज या समुद्र ओहोटीच्या वेळी खाडीतून बाहेर काढता येणे शक्य होत नसल्याने त्या पाण्यातच बुडवण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. या चार संक्शन पंप प्रत्येकी पाच लाख प्रमाणे या चार सक्शन पंपाचे एकुण २० लाख व सात बार्जेस प्रत्येकी २० लाख प्रमाणे एक कोटी ४० लाख रुपये आदी एकुण 1 कोटी ६० इतक्या रक्कमेचा मुद्देमाल पाण्यातच नष्ठ करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले. या कारवाईत तहसीलदार वासुदेव पवार, निवासी नायब तहसीलदार सुभाष जाधव, मंडळ अधिकारी मुंब्रा तसेच तलाठी गोविंदराव वतारी, गणेश भुताळे, सोमा खाकर, विश्वनाथ राठोड व विजय गढवे आदींचा सहभाग होता.या कारवाई एकही कामगार हात लागलेला नसल्यामुळे प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला नसल्याचे दिसून येत आहे.