डिजी ठाणेस विरोध करणारा अधिकारी सक्तीच्या रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:27 AM2020-03-06T01:27:47+5:302020-03-06T01:28:01+5:30
मुदत संपण्याआधीच निविदेला मुदतवाढ दिल्याचे डिजी ठाण्याचे प्रकरण महापालिकेत गाजत आहे.
ठाणे : मुदत संपण्याआधीच निविदेला मुदतवाढ दिल्याचे डिजी ठाण्याचे प्रकरण महापालिकेत गाजत आहे. त्यात आता ज्या कालावधीत या प्रकरणाला मंजुरी दिली, त्यावेळेच्या संबंधित विभागाच्या मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वरूप कुलकर्णी यांना प्रशासनानेच सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांना एक महिन्याचा पगारही दिला नसल्याचे उघड झाले आहे. मात्र, विधिमंडळात या प्रकल्पाचे वाभाडे निघाल्यानंतर याच अधिकाऱ्यास त्याची उत्तरे देण्यासाठी मंत्रालयात प्रशासनाकडून धाडण्यात येत असल्यामुळे त्याने आता व्यथित होऊन अनेक प्रश्न करून प्रशासनासमोर नवे संकट उभे केले आहे.
काहीही चूक नसताना सक्तीच्या रजेवर पाठविल्यामुळे माझी सामाजिक, आर्थिक तसेच प्रशासकीय पातळीवर कुचंबणा होत असून त्याचा मानसिक त्रासही होत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या मदतीला महापौर नरेश म्हस्के हे धावून आले असून त्यांनी प्रशासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेचा देशातील पहिला डिजिटल प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे असून संबंधित एजन्सीला मुदतवाढ देऊन २२ कोटींचे बिल अदा केल्याचे विधानसभेतही पडसाद उमटले आहेत. ज्या अधिकाºयाच्या गैरहजेरीत हे प्रकरण घडले, त्या कुलकर्णी यांनाच मंत्रालयात जबाब देण्यासाठी पालिकेने पाठविले आहे. त्यामुळे त्यांनी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांना पत्र लिहून मला सक्तीच्या रजेवर तुम्हीच पाठविले होते. त्या महिन्याचा पगारही दिलेला नाही किंवा रजेवर पाठविण्यामागचे कारणही आपण दिलेले नाही. माझ्याकडून काही चुकीचे झाले आहे का? किंवा मला रजेवर जाण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे पत्र किंवा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली नाही. असे असताना मला सक्तीच्या रजेवर पाठविण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
>महापौरांनी मागविला अहवाल
यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनीही अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना पत्र पाठवून कुलकर्णी यांनी जे काही प्रश्न केले आहेत, त्याची उत्तरे द्यावीत, अशा प्रकारे अधिकाºयावर कारवाई करून त्याचे मानसिक संतुलनही बिघडविण्याचे काम या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे या विषयामागचे नेमके कारण स्पष्ट करावे तसेच याचा अहवाल तत्काळ सादर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत. यामुळे प्रशासन चांगलेच गोत्यात आले आहे.
>नियमबाह्य कामास केला होता विरोध : ज्या वेळेस मुदत संपण्याआधीच निविदेला वाढीव मुदतवाढ देण्याचे प्रकरण घडत होते, त्यावेळेस या अधिकाºयाला सदर प्रस्तावावर स्वाक्षºया करण्यास भाग पाडले जात होते. परंतु, त्याने या नियमबाह्य प्रकाराला विरोध केल्यानेच त्याला सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.
>अद्याप माझ्या कडे ते पत्र आलेले नाही, त्यामुळे त्या पत्रात नेमका काय उल्लेख आहे, तो पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणे शक्य नाही.
- समीर उन्हाळे,
अतिरिक्त आयुक्त, ठामपा