५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीसाठी विरोधकांकडून पुन्हा सत्ताधाऱ्यांवर दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 04:26 PM2018-03-16T16:26:21+5:302018-03-16T16:26:21+5:30
मुंबईत मुख्यमंत्र्यांना घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर आता ठाण्यातही विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाची आठवण करुन देत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी लावून धरली आहे.
ठाणे - मुंबईत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षाने पुन्हा एकदा ठाण्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याने आता यापूर्वी मालमत्ता कर माफीचा आपण आणलेला प्रस्ताव पुन्हा येत्या महासभेत आणावा अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी महापौरांकडे केली आहे .
मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुंबईत शिवसेनेची कोंडी करत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाण्यात मात्र या करमाफीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने निवडणुकीपासून कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. विविध मुद्द्यावर श्रेय घेण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात सुरवातीपासूनच श्रेय वादाची लढाई सुरु आहे. ठाण्यात मात्र भाजपाची कोंडी करण्यात तसेच वचनपूर्ती करणे सत्ताधारी शिवसेना पक्षाला जमलेली नाही.
मार्च महिन्यात ठाण्याचे महापौर बसल्यानंतर आतापर्यंत झालेल्या महासभेत एकदाही करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाकडून आणला गेला नाही. याउलट पालिका प्रशासनाकडूनच मालमत्ता करामध्ये १० टक्के कारवाढीचा प्रस्ताव बजेटमध्ये आणण्यात आला होता. जोपर्यंत सभागृहात करमाफीचा प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत प्रशासकीय कोणत्याच प्रकारच्या हालचाली करता येत नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव घोषणा करूनही सत्ताधाºयांकडून आणण्यात येत नसल्याने यापूर्वी झालेल्या महासभेत विरोधकांकांकडूनच मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाबाबत पुढे कोणत्याच प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. मुंबईत आता ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता ठाण्यात देखील यासाठी विरोधकांनी दबाव आणण्यास सुरु वात केली आली असून करमाफीचा प्रस्ताव येत्या महासभेत घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.