उल्हासनगरातील संधीसाधू डॉक्टर महापालिकेच्या टार्गेटवर, रुग्णावर उपचार नाकारल्यास गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:34 PM2020-07-08T17:34:07+5:302020-07-08T17:35:32+5:30
उल्हासनगरात रुग्णाची संख्या ३१०० पेक्षा जास्त झाली असून शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यास उशीर होत आहे.
उल्हासनगर : कोरोनाच्या महामारित खाजगी रुग्णालय रुग्णावर उपचार करीत नसल्याने अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका आक्रमक झाली असून रुग्णालयात आलेल्या रुग्णावर उपचार केला नाहीतर, रुग्णालयावर गुन्हा दाखल करून सबंधित डॉक्टरांची पदवी रद्द करण्याची शिफारस करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहे.
उल्हासनगरात रुग्णाची संख्या ३१०० पेक्षा जास्त झाली असून शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यास उशीर होत आहे. परिणामी रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. मात्र खाजगी रुग्णालय कोरोनाच्या भीतीपोटी रुग्णांना उपचार करण्यास नकार देत असल्याने, उपचार विना रुग्णाचे जीव जात आहे. याबाबतच्या असंख्य तक्रारी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे आल्यावर, त्यांनी मंगळवारी खाजगी रुग्णालयात येत असलेल्या रुग्णावर उपचार करा. नाहीतर रुग्णालयावर गुन्हा दाखल करून सबंधित डॉक्टरची पदवी रद्द करण्याची शिफारस मेडिकल असोसिएशनला करण्यात येणार आहे. असे आदेश काढले आहे. आयुक्तांच्या आदेशाने नागरिकांना दिलासा तर खाजगी रुग्णालयाचे धाबे दणाणले आहे.
शहरांतील खाजगी रुग्णालयांनी रुग्णाबाबत असहकाऱ्यांची भूमिका घेवून उपचार करण्यास नकार देत असल्याने, रुग्णांचा मृत्यू होत आहे. अखेर महापालिका आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतली. रुग्णालयात आलेल्या रुग्णावर उपचार सुरू करून त्यांचा स्वाब अहवाल कोरोना पोझीटीव्ह आल्यास महापालिका माहिती दया. महापालिका अश्या पोझीटीव्ह रुग्णांना कोविड रुग्णालयात त्वरित हलविणार आहे. असे महापालिकेने आदेशात स्पष्ट केले. महापालिका आदेशाला खाजगी रुग्णालय किती सहकार्य करतात. हे लवकरच उघड होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील वाढत्या रुग्णांची दखल घेवून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी शहरातील सीएचएम व आरकेटी कॉलेजेसह राधास्वामी सत्संगची जागा कोविड रुग्णालयासाठी ताब्यात घ्या. असे आदेश काढले आहे.
कोविड रुग्णालयात गैरसोय
महापालिकेने उभारलेल्या कोरोना रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे व्हिडिओ रुग्ण पाठवीत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांचे वाभाडे निघत आहे. रुग्णांना जेवण, औषध, पाणी, साफसफाई आदींच्या गैरसोयीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जात असून पालिका आरोग्य सुविधे वर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे