तळवलकरांमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपटात संधी- सुहास जोशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:07 IST2018-08-25T01:06:16+5:302018-08-25T01:07:03+5:30
रंजना जाईपर्यंत कुणालाच संधी नव्हती, प्रेक्षकांसमोर उलगडल्या गमतीजमती

तळवलकरांमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपटात संधी- सुहास जोशी
ठाणे : रंजनाबाई जाईपर्यंत मराठीसिनेमांमध्ये काम करण्याची संधी कोणत्याही मराठी अभिनेत्रीला मिळाली नाही. त्यांच्या अपघातानंतर सविता प्रभुणे, निवेदिता सराफ यांना मराठी चित्रपटांत संधी मिळाली. त्यानंतर, स्मिता तळवलकर यांनी चित्रपट काढले, तेव्हा एका कुटुंबासारखे आम्ही राहू लागलो. त्यांच्यामुळे मराठी सिनेमांत काम करण्याची संधी अनेक अभिनेत्रींना मिळाली, असे स्पष्ट वक्तव्य अभिनेत्री सुहास जोशी यांनी जोश्यांच्या लेकी-सुना या कार्यक्र मात केले.
इंद्रधनू संस्थेतर्फेगुरुवारी सहयोग मंदिर येथे हा कार्यक्र म आयोजित केला होता. सुहास जोशी पुढे म्हणाल्या की, नाटक करण्याकडेच माझा अधिक कल होता. मला सिनेमाचे काडीचे आकर्षण नव्हते. चित्रपट, मालिकांमध्ये काम केल्यावर कलाकार प्रसिद्ध होतात, त्यामुळे कितीही वाईट मालिका किंवा चित्रपट असो, त्या आम्हाला कराव्या लागतात. त्याशिवाय, प्रेक्षक नाटक बघायला येत नाहीत. एकदा सुरू झालेल्या मालिका केव्हा बंद होतील, हे ब्रह्मदेव जरी खाली अवतरला, तरी सांगू शकणार नाही, असे सांगताना त्यांनी सई परांजपे, अरुण जोगळेकर, विजया मेहता यांच्यासोबत काम करतानाच्या गमतीजमती प्रेक्षकांसमोर उलगडल्या. डेलीसोप मालिकांबद्दल त्या म्हणाल्या की, तेथे लिहिणाऱ्याला, सादर करणाºयाला, निर्मात्याला कोणालाच आपण काय करत आहोत, हे माहीत नसते. मी आयुष्यात खूप बिझी अॅक्ट्रेस कधी नव्हते, हिंदी सिनेमा कधी माझ्या आवडीचे नव्हते, मराठी सिनेमांमध्ये आवडीच्या भूमिका केल्याचे त्यांनी सांगितले. गायिका मृदुला दाढे-जोशी यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरूने गाण्याची नजर दिल्याचे सांगितले. यावेळी सोनालिका जोशी यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
कवितेचे गाणे करताना कवीने लिहिलेल्या शब्दांना न्याय देण्याबरोबरच दोन वाक्यांमधील अर्थदेखील आपल्या गाण्यातून समोरच्यापर्यंत पोहोचावेत, यासाठी नेहमीच प्रयत्न करत असल्याचे मृदुला दाढे-जोशी यांनी यावेळी सांगितले.
मृदुला यांनी मृदुल करांनी छेडीत तारा आणि तुम्हावरी केली मी मर्जी बहाल, ही लावणीची झलक प्रेक्षकांसमोर सादर केली. यावेळी त्यांच्या या झलकेला प्रेक्षकांनी दाद दिली. अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेत्री पद्मश्री जोशी यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या.
याचवेळी त्यांनी सुहास जोशी यांच्या मालिका कधी संपतील, हे निर्मात्याला माहीत नसे. या वाक्याला दुजोरा देऊन पल्लवी जोशी यांनी सध्या वेबसिरीजसाठी काही नवीन संकल्पना असून त्या प्रेक्षकांना लवकरच पाहावयास मिळतील, असे सांगितले.