घटस्फोटित पत्नीचे बनावट खाते उघडून अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:23 AM2018-04-17T01:23:23+5:302018-04-17T01:23:23+5:30
घटस्फोटित पत्नीचे बनावट बँक खाते उघडून २० लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका ठगाला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत.
ठाणे : घटस्फोटित पत्नीचे बनावट बँक खाते उघडून २० लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका ठगाला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत.
ऊर्मिला गौड यांचा बिजय गौड यांच्याशी १० मे १९८७ रोजी विवाह झाला होता. ऊर्मिला गौड ब्युटीपार्लर चालवत असून त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशी आहे. दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यामध्ये बिजय सहा महिने तुरुंगात होता. नंतर कुवेत येथील एका कंपनीमध्ये १० वर्षे नोकरी केली. त्यावेळी कंपनीच्या मालकाची फसवणूक करून पैसे घेऊन तो भारतात पळून आला. याला कंटाळून त्यांनी ठाण्याच्या कुटुंब न्यायालयातून ३ जून २०१६ रोजी त्याच्याकडून घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर बिजयने रीमाशी दुसरा विवाह केला. १ जुलै २०१६ रोजी त्याने खोपटच्या इंडियन बँकेत स्वत:च्या आणि पहिली पत्नी ऊर्मिलाच्या नावावर खाते उघडले. तेव्हा त्याने पहिल्या पत्नीचे नाव आणि रीमाचा फोटो वापरला. यावेळी रीमाने बनावट सही केली. ऊर्मिलाच्या नावे मुलुंड येथील एलबीएस रोडवरील निर्मल लाइफस्टाइल सोसायटीमध्ये फ्लॅट होता. हा फ्लॅट विकण्यासाठी बिजयने इंडियन बँकेतील बनावट खात्याचा वापर केला. जळगाव येथील रमेश दामू सुशीर यांना त्याने हा फ्लॅट विकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी टोकन म्हणून त्याने सुशीर यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. पहिल्या पत्नीच्या नावे उघडलेल्या बनावट बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्यानंतर त्याने संपूर्ण रक्कम काढून घेतली.
विम्याची रक्कम हडपली
बिजय आणि रीमाने वाशी येथील भारत को-आॅप. बँकेत ऊर्मिला यांच्या नावे आणखी एक बनावट खाते उघडले. मुदत पूर्ण झालेल्या त्यांच्या विमा पॉलिसीची रक्कमही बिजयने हडपली. जानेवारी २०१८ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ऊर्मिला यांनी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली होती.