स्मार्ट सिटीत पूर्ण झालेल्या प्रकल्प हस्तांतरणास विरोध; महापौरांसह आयुक्तांचाही आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:36 PM2020-12-29T23:36:55+5:302020-12-29T23:37:01+5:30
महापौरांसह आयुक्तांचाही आक्षेप : सीईओंना दणका
ठाणे : स्मार्ट सिटीतून काही प्रकल्प पूर्ण झाले असून, ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर आला होता, परंतु किती प्रकल्प पूर्ण झाले, त्यांची निगा देखभाल कोण करणार, काहींचे पैसे देणे शिल्लक असताना, त्यांचे दायित्व महापालिकेने का स्वीकारावे, असे प्रश्न महापौर नरेश म्हस्के यांनी या बैठकीत केले. शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव आणि महापालिका आयुक्तांनीही या प्रकल्पांची पूर्णपणे खातरजमा केल्याशिवाय ते हस्तांतरित करू नयेत, असे सुचविले. यावेळी मनमानी पद्धतीने हे प्रस्ताव आणणारे स्मार्ट सिटीचे सीईओ गणेश देशमुख यांना चांगलाच दणका बसला आहे.
स्मार्ट सिटीतील अर्बन रेस्ट रूम, डीजी ठाणे, शाळा इमारतींवर सोलार प्रकल्पांसह इतर प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठीचे प्रस्ताव पटलावर होते, परंतु हस्तांतरित करण्यापूर्वी ते पूर्ण झाले आहेत का? याच्या खातरजमेसह त्यांची निगा-देखभाल कोण करणार? मेटेनन्स कोण देणार, असेही प्रश्न करण्यात आले. या सर्वांची सत्य परिस्थिती पाहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, डीजी ठाणे प्रकल्पाचे पैसे देणे शिल्लक आहे, परंतु त्याचे दायित्व महापालिकेने का घ्यावे, असा प्रश्नही महापौरांनी केला, तर अर्बन रेस्ट रूममधील अनेक रूम बंद आहेत, त्यांची देखभाल कोण करणार? असेही त्यांनी विचारले.
महापौरांनी उपस्थित केलेल्या मुद्याला धरून शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनीही यावर आक्षेप घेऊन हे विषय तूर्तास थांबविण्यास सांगितले. या सर्वांची पाहणी करून काही दायित्व आहे का? याची माहिती घेऊनच ते हस्तांतरित करावेत, असे या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.