नदीतून पाणी देण्यास विकासकांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:06+5:302021-03-16T04:41:06+5:30
भातसानगर : पाटबंधारे विभागाने ठाणे व पुणे जिल्ह्यातील विकासकांना गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी नद्यांतून थेट पाणी उचलण्याच्या दिलेल्या परवानगीस आता ...
भातसानगर : पाटबंधारे विभागाने ठाणे व पुणे जिल्ह्यातील विकासकांना गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी नद्यांतून थेट पाणी उचलण्याच्या दिलेल्या परवानगीस आता स्थानिकांमधून विरोध होत असून पाटबंधारे विभागाच्या या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी एकमुखी फाउंडेशनने शहापूर तालुका तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील भातसा, उल्हास, काळू, वैतारणा या नद्यांच्या पाण्यावर स्थानिक शेतकरी भाजीपाला, वीटभट्टी यांसारख्या व्यवसायातून आपली उपजीविका करतात. शहापूर तालुक्यातील भातसा नदीचे पाणी तर नदीकिनारी असलेल्या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. पुढे याच नदीचे पाणी मुंबई शहरालाही पुरविले जाते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक गावे, पाड्यांना मार्चपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात होते. त्यातच, ठाणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण तसेच समृद्धी महामार्ग व त्यांना समांतर विकसित होणाऱ्या स्मार्ट सिटीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होऊ शकतो. स्थानिकांच्या हक्काचे पाणी पळवले जाणार असल्याने शेती आधारित उद्योग तर संकटात येतील, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे. निर्णयाचे ग्रामीण भागावर होणारे दूरगामी दुष्परिणाम पाहता पाटबंधारे विभागाचा हा निर्णय त्वरित स्थगित करण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांना निवेदनातून घातले आहे. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रामनाथ दवणे, सचिव विनोद लुटे, कार्याध्यक्ष वसंतकुमार पानसरे, नीलेश डोहाळे, नितीन कुडव आदी उपस्थित होते.