मीरा-भार्इंदरमध्ये विरोधक आक्रमक : भाजपाच्या गटांगळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:03 AM2018-02-27T02:03:51+5:302018-02-27T02:03:51+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रीडासंकुलात साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर केलेल्या नवघरच्या प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रीडासंकुलात साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर केलेल्या नवघरच्या प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली. याविरोधात शिवसेना व काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाल्याने काही वेळेपुरता सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.
पालिकेने माजी खा. संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या क्रीडा संकुलात पहिला तरणतलाव साकारला आहे. त्याचे कंत्राट खाजगी संस्थेला दिल्याने संस्थेकडून त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये वार्षिक रक्कम जलतरणपटूंकडून वसूल केली जाते. पालिकेच्या तरणतलावासाठी एवढी भरमसाठी रक्कम वसूल करणे आक्षेपार्ह असून त्यासाठी नाममात्र दर निश्चित केला जावा, अशी मागणी भाजपाचेच मोरस रॉड्रिक्स यांनी तत्कालीन महापौर डिम्पल मेहता यांच्याकडे केली होती. मात्र या तरणतलावाला पर्याय म्हणून नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर नवा तरणतलाव विकासकाच्या माध्यमातून साकारण्याची मागणी सेना नगरसेवक दिनेश नलावडे व माजी नगरसेवक राजेश वेतोस्कर यांनी केली होती. त्यासाठी गटनेत्या नीलम ढवण यांनीही आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या तलावाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूदही केली. त्या तरतुदीनुसार आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला. मात्र तो पुढील सभेत घेण्याचे स्पष्ट करीत भाजपाने त्यावर कोलांटउडी घेतली. हा तरणतलाव साकारला, तर त्याचे श्रेय शिवसेनेला जाण्याची भीती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्यानेच त्यांनी त्यावर चर्चा न करताच तो बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यांनी भाजपाच्या या मनसुब्याला तीव्र विरोध करत नवघरच्या तलावाचा निधी इतरत्र वर्ग करण्याचा सत्ताधाºयांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
प्रस्तावित तरणतलाव नवघर येथील मोठ्या लोकवस्तीत साकारणार असल्याने तो जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार होता. परंतु सत्ताधाºयांनी त्याला बगल देत विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला.
दहिसर चेकनाका परिसरात लोढा अॅक्वा येथे प्रस्तावित तरणतलावाचा विकास आधी करायचा, नंतर नवघर येथील तलावाचा विकास करायचा आणि शहरात सहा तरणतलाव बांधण्याचा भाजपाचा मानस असल्याचा दावा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी केला. त्यावर विरोधकांनी, या तलावाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने नवघरच्या तलावाला विरोध का, असा प्रश्न सत्ताधाºयांना केला.
विरोधाचा ठराव मांडून केला बहुमताने मंजूर-
विरोधकांनी त्यावर गोंधळ घालताच महापौरांनी विरोधकांना ठराव मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिवसेनेचे दिनेश नलावडे यांनी तलाव साकारण्याचा, तर सत्ताधारी भाजपाचे मोहन म्हात्रे यांनी
त्याविरोधात ठराव मांडला आणि मतदानात म्हात्रे यांचा विरोधाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनीही नवघरच्या तलावाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन पुढील
सभेत त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी केली. पाटील यांच्या या विधानामुळे विरोधकांना हायसे वाटले असले, तरी पाटील यांनी विरोधाच्या ठरावावर मतदान केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.