महाराष्ट्रातही नागरिकत्व कायद्याला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:13 AM2020-01-19T06:13:03+5:302020-01-19T06:13:38+5:30
महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीत, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशाच्या मँचेस्टर शहरात आल्याने अभिमान वाटत असून पाच वर्षांचा नागरिकांच्या मनातील लाव्हा असा आंदोलनाच्या माध्यमातून देशभर उमटत आहे.
भिवंडी : पंजाब आणि केरळ सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्यांना विरोध करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी भिवंडीतील जाहीर सभेत केले. केंद्र सरकारने जबरदस्तीने लागू केलेल्या या कायद्याला कुणीही घाबरू नये, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.
भिवंडीतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भिवंडीतील पुरोगामी पक्ष, संघटनांच्या संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आव्हाड म्हणाले, केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात असून याविरोधात आपण स्वत: ठाणे येथे पहिले आंदोलन केले. जोपर्यंत हा कायदा केंद्र मागे घेत नाही, तोपर्यंत जेथेजेथे आंदोलन होईल, तेथेतेथे मी सहभागी होणार आहे. देशात पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. हा कायदा हिटलरशाही प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक लागू केला आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेला छेद देणारा असल्याने कायद्याविरोधातील लढाई ही डॉ. आंबेडकरांची गोळवलकरांशी लढाई आहे, असेही आव्हाड म्हणाले. या कायद्याला विरोध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील प्रत्येक चौकाचौकांत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून या कायद्याला आपला विरोध दर्शविण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, शेतकरी नेते योगेंद्र यादव, जेएनयू विद्यार्थी नेते उमर खालिद, अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थी नेता सलाह अहमद सादरी, माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान, जेएनयू विद्यार्थिनी नेत्या डॉ. उमेजा, निदा शेख, दिल्ली जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी नेते डॉ. मोहम्मद कामरान,समाजसेवक मुश्तमा फारूक, संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक किरण चन्ने, सहनिमंत्रक कॉ. विजय कांबळे, मो. अली शेख, शादाब उस्मानी आदी उपस्थित होते.
मोदींविषयी जनतेत संभ्रम
महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीत, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशाच्या मँचेस्टर शहरात आल्याने अभिमान वाटत असून पाच वर्षांचा नागरिकांच्या मनातील लाव्हा असा आंदोलनाच्या माध्यमातून देशभर उमटत आहे. स्वत:ला विकासपुरु ष समजणारे मोदी विकासपुरु ष आहेत की विनाशपुरु ष, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे. त्यामुळे मोदींनी या जनआंदोलनाकडे उघड्या डोळ्यांनी पाहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केले.