अतिरिक्त तोडफोडीला विरोध, व्यापा-यांनी दुकाने ठेवली बंद, नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:38 AM2017-10-06T01:38:11+5:302017-10-06T01:38:48+5:30
शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याचे काम
भिवंडी : शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याचे काम पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हाती घेतले आहे. काही २ि२ठकाणी हे काम संपल्यानंतर अतिरिक्त सहा मीटर जागा तोडण्यासाठी अधिका-यांनी दुकाने, घरे व इमारतींवर लाल पट्ट्यांची निशाणी मारण्याचे काम सुरू केल्याने या मोहिमेला रहिवासी व व्यापा-यांनी कडाडून विरोध केला. याच्या निषेधार्थ कल्याण रोड व्यापारी-रहिवासी संघर्ष समितीने गुरुवारी काही काळ दुकाने बंद ठेवून पालिकेविरोधात आंदोलन केले होते. दरम्यान, पालिकेची ही अन्यायकारक कारवाई थांबवण्यासाठी व्यापा-यांनी खासदार कपिल पाटील, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, महापौर जावेद दळवी, आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रहिवाशांमधील संताप पाहून आयुक्तांनीही खासदारांनी केलेल्या विनंतीवरून सध्या हे काम थांबवले आहे.
शहरातील अंजूरफाटा ते वंजारपाटीनाका आणि कल्याण रोड, राजीव गांधी चौक ते साईबाबा बायपास या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात व वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाजवळ मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आहे. पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आयुक्तांनी या मार्गावरील रहिवासी व दुकानदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याप्रमाणे नागरिकांनी विकास आराखड्यानुसार प्रस्तावित २४ मीटर जागा मोकळी करून दिली. रस्त्यात बाधा निर्माण करणारे अतिक्रमण पालिकेने दूर केले.
प्रशासनाने याव्यतिरिक्त सहा मीटर जागेसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देत नोटिसा बजावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, तोडलेल्या जागी रहिवाशांनी दुरुस्तीची कामे पूर्ण केली असताना पुन्हा सहा मीटर तोडण्यासाठी इमारतींवर लाल पट्टे मारल्याने नागरिकांनी नकार दिला. तसेच यापूर्वी झालेल्या रस्ता रुंदीकरणासाठी बाधित दुकानदार व रहिवाशांना कोणताही मोबदला पालिका प्रशासनाने न दिल्याचा मुद्दा कल्याण रोड व्यापारी-रहिवासी संघर्ष समितीच्या सदस्यांनी खासदार पाटील, पोलीस उपायुक्त मनोज पाटील व पालिका आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे झालेल्या बैठकीत उपस्थित केला.
शहराच्या विकासासाठी हे काम हाती घेतले आहे, असे आयुक्तांनी सांगून तोडकाम सुरू ठेवू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी महापौर जावेद दळवी व पाटील यांच्याकडे धाव घेत प्रशासन करत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. त्यामुळे पाटील यांनी आयुक्त म्हसे यांच्याशी संपर्क साधत कारवाई थांबवण्याची सूचना केली. तसेच यासंदर्भात बैठक घेण्याबाबत सांगितले. या बैठकीत माजी नगरसेवक दिन मोहम्मद खान, अनिल फडतरे, राम लहारे, शादाब उस्मानी, सुधाकर आंचल, सुभाष गुप्ता, प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शहरात केंद्र सरकार व एमएमआरडीएच्या निधीतून ५२ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे प्रस्तावित आहे. त्याबरोबर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी व रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने अशा इमारती तोडणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेचे अधिकारी बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.