ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 07:41 PM2017-10-12T19:41:27+5:302017-10-12T22:37:21+5:30
अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
ठाणे : अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
दिवाळी आली तोंडावर... रेशन नाही दुकानावर, रेशन बचाव... अच्छे दिन लाव, अच्छे दिन आ गये... गरीबों का राशन खा गये... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणसी पाच किलो धान्य मिळते, तर अंत्योदय लाभार्थ्यांना कितीही सदस्य असले, तरी ३५ किलो धान्य मिळत असे. परंतु, आता अंत्योदय कार्डधारकांना प्राधान्य गटातील पाच किलो धान्य मिळणार आहे. आदिवासी, गरीब, कातकरी, कोलाम किंवा विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजाराने ग्रस्त असणाºया कुटुंबप्रमुखाचे कुटुंब आदींवर शासनाच्या या निर्णयामुळे अन्याय होत आहे. तो त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. ठाण्यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.
अंत्योदय रेशनकार्डधारक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निश्चित केले आहेत. तरीदेखील, या कार्डधारकांना प्राधान्य गटात टाकून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या आंदोलनामध्ये अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानाचे संजीव साने, स्वराज इंडियाचे उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.
दिवाळीत सरकार खानार तुपाशी ....गरीब राहणार उपाशी
पालघर, ठाणे, रायगड , नासिक जिल्ह्यात १३ ऑक्टोबरला सर्व तहसील कार्यलयावर गरिबांच्या अन्न अधिकारासाठी जंबो शिष्टमंडळ निदर्शने करणार आहे. २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने शिधा पत्रिकेवर १+२ नावे असलेल्या आदिवासी , कातकरी, विधवा , वृध्द, गरीबांचे अंत्योदय योजनेचे धान्य कमी करुन दिवाळी सणातच गरीबांवर उपासमारीची वेळ आणली. या मनमाणी शासनाविरोधात श्रमजीवीचे ठाण्यासह चार जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन छेडले जाणार आहे.