शांतीनगरमध्ये पदपथांच्या संरक्षक जाळ्यांना विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:50 AM2019-12-11T01:50:49+5:302019-12-11T01:51:02+5:30
रहिवाशांना त्रास ;पैशांचा अपव्यय
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने शांती नगरमधील अंतर्गत रस्त्यांलगतच्या पदपथांना लोखंडी संरक्षक जाळ््या लावल्या असून स्थानिक नागरीकांनी या विरोधात तक्रारी केल्या आहेत. जाळ््यांची आवश्यकता नसताना पैशांचा नाहक अपव्यय केला गेला असून रहिवाशांना याचा त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेने मार्च महिन्यात श्री गणेश इंटरप्रायझेस या ठेकेदारास मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २,४ व १० च्या मुख्य रस्त्यांच्या पदपथांना लोखंडी संरक्षक जाळ््या लावण्यासाठीचे कंत्राट दिले होते. सदर कामाचे कंत्राट २२ लाख २७ हजारांचे असून ठेकेदाराने मुख्य रस्ता सोडून शांती नगर सेक्टर चार मधील अंतर्गत पदपथांवरच लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत.
पालिकेच्या कार्यादेशमध्ये मुख्य रस्त्यांवरील पदपथांना जाळ््या लावण्याचे नमूद केलेले असताना ठेकेदाराचे हित जपताना करदात्या नागरीकांच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी तथा शिवसेनेचे शाखाप्रमुख तेजस बागवे यांनी केला आहे. पालिकेला दिलेल्या लेखी तक्रारीत बागवे यांनी म्हटले आहे की, जाळ््या लावल्यामुळे मुलं, महिला, ज्येष्ठ नागरीक यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जाळ््या काढून टाकाव्यात. ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाई करावी.