विरोधी पक्षनेता व शिवसेना सदस्यात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:22 AM2020-02-21T01:22:54+5:302020-02-21T01:23:22+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा : जातीवाचक शब्दोल्लेख वगळल्यानंतर प्रकरण निवळले
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत गुरुवारी शिवसेना सदस्य मल्लेश शेट्टी यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते राहुल दामले यांना उद्देशून जातीवाचक शब्दाचा वापर केला. त्यामुळे सभेत शेट्टी विरुद्ध दामले यांच्यात चांगलीच जुंंपली. अखेरीस, जातीवाचक शब्दोल्लेख महासभेच्या कामकाजातून वगळण्यात यावेत, असे आदेश महापौर विनीता राणे यांनी दिल्यावर प्रकरण निवळले.
महासभेच्या पटलावर कार्यकारी अभियंते चंद्रकांत कोलते व सुनील जोशी यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता, शेट्टी यांनी दोघांविरोधात काही गुन्हे दाखल आहेत का, असा सवाल केला. त्यावेळी उपायुक्त मारुती खोडके यांनी कोलते यांच्याविरोधात गुन्हा दाखल नाही. मात्र, जोशी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे चौकशी सुरू आहे, अशी माहिती दिली. त्यावर शेट्टी यांनी जोशी यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊ नये. कोलते यांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यास माझी हरकत नाही, असे सांगितले. यावेळी दामले म्हणाले, निवृत्त शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांच्याही पदाला मान्यता देण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यावर शेट्टी यांनी कुलकर्णी हे महापालिका सेवेतून निवृत्त झाले आहे. त्यांचा प्रश्न का उपस्थित केला जात आहे. मात्र, दामले त्यांच्या मुद्यावर आग्रही राहिले. त्यामुळे शेट्टी यांनी आरोप केला की, जोशी व कुलकर्णी हे एका विशिष्ट जातीचे असल्याने त्यांचा मुद्दा तुम्ही लावून धरला आहे. त्यावर दामले यांनी शेट्टी हे जातीवाचक बोलत आहेत. त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. मात्र, शेट्टी यांनी मी शब्द मागे घेणार नाही, असा पवित्रा घेत दामले यांच्यावर संतप्त झाले. यावेळी भाजपचे गटनेते शैलेश धात्रक यांनी दामले यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तर, शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी शेट्टी यांना आवरण्याचा प्रयत्न केला.
अपक्ष नगरसेवकाचा संताप
च्महापालिकेत शिवसेनेला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी त्यांची सभा तहकुबी चर्चेला घ्यावी. मला बोलू द्यावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र, सचिव संजय जाधव यांनी मागच्या वेळेस तहकूब केलेली सभा आज सुरू आहे. विषयपत्रिकेस सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा विषय मांडता येणार नाही. मात्र, या मुद्यावर आग्रही असलेल्या तानकी यांनी थेट महापौरांच्या दिशेने धाव घेतली. ते व्यासपीठावर पोहोचले. त्यावेळी महापौरांनी सुरक्षारक्षकांना पाचारण केले. सुरक्षारक्षक व तानकी यांच्यात झटापट होऊन शोभा होणार, असा अंदाज येताच ज्येष्ठ सदस्यांनी तानकी यांची समजूत काढून त्यांना खाली बसविले. यावेळी तानकी यांची सभागृह नेते प्रकाश पेणकर व शिवसेना सदस्य विश्वनाथ राणे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली.
सभेनंतर घेतली दोघांनी गळाभेट
महासभेचे कामकाज संपल्यावर दामले व शेट्टी यांना प्रतिक्रियेसाठी पत्रकारांनी गाठले असता त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा वादच झालेला नाही, असे सांगत एकमेकांची गळाभेट घेत या विषयावर पांघरूण टाकले.